ब्लॅकमेलर लेडी डॉन प्रीती दास होती पोलिसांच्या ‘ इतक्या ‘ जवळची ? असा करून घ्यायची यंत्रणेचा वापर

शेअर करा

ब्लॅकमेलर लेडी डॉन म्हणून पॉप्युलर झालेल्या प्रीती दासचे एक एक कारनामे बाहेर येत असून तिने आतापर्यंत शेकडो लोकांना गंडवल्याचे स्पष्ट झाले आहे पण त्याहून धक्कादायक बाब म्हणजे प्रिती दास ही पोलिस ठाण्यामध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. मोठया मोठ्या राजकीय नेत्यांच्या सोबत फोटो लावून ती पोलीस प्रशासनाचा वापर करून घ्यायची आणि ब्लॅकमेलचे रॅकेट चालवायची . पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह “विशेष’ अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे .

प्रीती दासने सुरुवातीला सीताबर्डीतील एनआयटी कॉम्पलेक्‍समध्ये पॉश कार्यालयात जॉब कन्सलटन्सी उघडली. तिने विदर्भातील शेकडो उच्चशिक्षित बेरोजगारांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. कार्यालयात सुंदर-सुंदर तरुणींना नोकरीवर ठेवून उच्चशिक्षित तरुणांना फोन करून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात होते. बेरोजगार युवक हे तिचे सुरुवातीला टार्गेट होते मात्र पुढे ब्लॅकमेलिंग पर्यंत तिची मजल गेली होती. जॉब देण्याच्या नावाखाली आजवर प्रीतीने कित्येक जणांना फसवले आहे . एखादा व्यक्ती फसवणूक झाल्याने तिला बोलू लागला तर “तुला गंडविलेल्या पैशातून 30 टक्‍के रक्‍कम पोलिसांनासुद्धा देते.. पोलिस काहीही बिघडवू शकणार नाही ‘ अशी धमकी देऊन ती त्याला गप्प करत असे.

नवीन पोस्टिंग झाले की पोलीस अधिकाऱ्यांसाठी पुष्पगुच्छ घेऊन भेटायला जाणाऱ्या कार्यकर्त्या व कार्यकर्ते प्रीतीचे कारनामे बाहेर आल्यावर आता पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत . पोलिसांसोबत पुष्पगुच्छ देताना फोटो काढून सेक्‍स रॅकेट, लॉज, हॉटेल्स, ऑटो-टॅक्‍सी अशा व्यक्तींकडून हफ्ते गोळा केले जातात. पोलिसांवर देखील वचक राहावा म्हणून राजकीय नेत्यांची देखील चापलुसी करून फोटो काढून त्याचा व्यवस्थित वापर करून कामे मार्गी लावली जातात . प्रीती दास हे फक्त एक उदाहरण असून प्रत्येक शहरात हे उद्योग सुरु आहेत . प्रीती दासच्या खऱ्या लाभार्थ्यांची नावे उघड झाली तर अनेक गोष्टी उघड होण्याची चिन्हे आहेत .

असा झाला प्रीतीच्या रॅकेटचा पर्दाफाश

इंजिनिअर असलेला नवल राधेश्‍याम पांडे (वय 28, रा. वर्धा ) हा मार्च 2017 मध्ये प्रीती दासकडे गेला. तिने एका कंपनीत नोकरीला लावण्याचे त्याला आमिष दाखवले, मात्र सदर कंपनीतील अधिकाऱ्यांना दीड लाख रुपये आणि माझी फी वेगळी द्यावी लागेल, असे सांगितले. सर्व पैसे कॅशने द्यावे लागतील, चेक किंवा बॅंक ट्रान्झॅक्‍शन चालणार नाही, अशी अट तिने ठेवली होती . गरजवंताला अक्कल नसते तसे बिचाऱ्या नवल पांडेने तिला दीड लाख रुपये दिले. त्यानंतर आज उद्या करत तिने तीन महिने घालवले व शेवटी तीन महिन्यात अपॉइंटमेंट लेटर तयार करून नवल पांडे याला दिले. नवल पांडे कंपनीत गेला असता सर्व बनाव असून आपल्याला दिलेले लेटर हे खोटे असल्याचे त्याच्या लक्षात आले. प्रीती दासला याचा जाब विचारताच तिने दमदाटी करीत पैसे परत करण्यास नकार दिला. नवल यांनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली.

“तुला गंडविलेल्या पैशातून 30 टक्‍के रक्‍कम पोलिसांनासुद्धा देते’ असे बोलून पोलिस काहीही बिघडवू शकणार नाही, अशी धमकी देत पैसे परत देण्यासाठी हात वर केले. अखेर नवल राधेश्‍याम पांडे याने सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार केली आणि प्रीतीस अटक करण्यात आली.


शेअर करा