फडणवीसांच्या ‘ डेटा बॉम्ब ‘ वर राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया , राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

शेअर करा

भाजपा नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर पांघरुण घातल्याचा आरोप केला आहे. फडणवीसांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल सादर केला. दरम्यान फडणवीसांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं असून गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात सरकार तयार करत असताना रश्मी शुक्ला सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करत होत्या असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“फडणवीसांना सादर केलेला फोन टॅपिंगचा अहवाल माझ्याकडे आहे. फडणवीस बदल्यांसाठी पैसे घेण्यात आले, ते या राज्याचे मुख्यमंत्री होते. गृहखातं त्यांनी सांभाळलं आहे. कोणताही मंत्री थेट बदली करत नाही, त्यासाठी एक कमिटी आहे. कोणताही मंत्री आपल्या अधिकारात या बदल्या करु शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे. जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्यांसाठीदेखील समिती आहे. त्यामुळे फडणवीस दिशाभूल करत आहेत,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

“फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि पोलीस बदलीची नियमावली माहिती असताना खोटा रिपोर्ट देण्यात आला, त्याच्या आधारे सरकारला बदनाम करण्याचा कट कारस्थान करत आहेत. रश्मी शुक्लांच्या बाबतीत सांगत आहेत की, त्यांनी परवानगी घेऊन फोन टॅपिंग केलं. त्यांनी कोणतीही परवानगी न घेता ३० लोकांचे फोन टॅप करत होत्या. हा गुन्हा आहे. जेव्हा महाराष्ट्रात सरकार निर्माण करण्याचं संकट होतं तेव्हा सगळ्यांचे फोन टॅप करण्याचं काम रश्मी शुक्ला करत होत्या, कुठेतरी भाजपाच्या एजंट या नात्याने काम करत असताना त्यांना बेकायदेशीरपणे फोन इंटरसेप्ट करण्याची त्यांना सवय लागली होती. ज्या अहवालाचा उल्लेख फडणवीस करत आहेत त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता टॅपिंग सुरु होतं. तसंच उल्लेख झालेल्या ८० टक्के बदल्या झालेल्या नाहीत,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

“फडणवीस आपण रिपोर्ट घेऊन केंद्रीय गृह सचिवांकडे जातो असं सांगत आहेत, याचा अर्थ बदल्या झालेल्या नाहीत. फडणवीस सत्ता गेल्यानंतर सरकार एक महिन्यात जाईल, दोन महिन्यात जाईल सांगत होतं. आमदार फुटतील असा दावा करत होते. सरकार पाडता आलं नाही म्हणून बदनाम करण्याचं काम भाजपा आणि फडणवीसांच्या माध्यमातून होत आहे. आज ते उघडे पडले असून दिलेली सर्व माहिती खोटी होती,” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

“फोन टॅपिंग बेकायदेशीर होतं त्यामुळे रश्मी शुक्ला यांना नवीन पद निर्माण करुन तिथे बसवण्यात आलं. रश्मी शुक्ला बेकायदेशीरपणे फोन टॅप करत होत्या. सरकार तयार करत असताना सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप रश्मी शुक्ला करत होत्या,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं. “सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी माझ्यावर उद्धव ठाकरेंचा दबाव होता असा दावा फडणवीसांनी केली. आपण यासाठी कायदेशीर सल्ला घेतल्याचंही ते म्हणाले. पण असा कोणताही कागद मंत्रालयात नाही. याचा अर्थ ते दिशाभूल करत होते,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

“पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी चुकीच्या पद्धतीने जनतेला माहिती देण्याचं काम केलं आहे. त्यांनी शरद पवार चुकीची माहिती देत असल्याचा उल्लेख केला. फडणवीसांनी उल्लेख केल्यानंतर गृहमंत्र्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून खुलासा केला होता. मीदेखील खुलासा केला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री यांच्या हालचालींसंबंधी त्यांनी काही पोलीस रेकॉर्ड सादर केले. यावेळी त्यांनी याबाबत नक्की माहिती नसल्याचं सांगितलं. याचा अर्थ कुठेतरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

“५ ते १५ तारखेपर्यंत अनिल देशमुख नागपूर येथे हॉस्पिटमध्ये दाखल होते. डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद बोलावली नव्हती. काही पत्रकार रुग्णालयाच्या गेटवर प्रश्न विचारत होते तेव्हा त्यांनी तिथे खुर्चीवर बसून उत्तरं दिली. ते नागपुरात होम कवारंटाइन होते असं आम्ही कधीच सांगितलं नाही. मुंबईत होम क्वारंटाइन होते हे स्पष्ट केलं होतं. डिस्चार्ज झाल्यानंतर खासगी विमानाने मुंबईला आल्यानंतर शासकीय निवासस्थानी २७ तारखेपर्यंत कोणतीही हालचाल नव्हती. फडणवीसांनी सांगितलं तिथं ते गेले नव्हते. फक्त व्यायामासाठी मैदानात जात होते,” असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. फडणवीस लोकांना भ्रमित करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.


शेअर करा