माणसांनाही लाजवेल असं भटक्या कुत्र्यांनी केलं काम, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल सलाम

शेअर करा

माणसांमधील माणुसकी हरपत चालली आहे पण मुक्या जिवांनी मात्र ही माणुसकी जपली आहे. ज्या मुक्या जीवांवर माणसं अत्याचार करतात तेच मुके जीव वेळ पडल्यास माणसांसाठी धावून येतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये भटक्या कुत्रे एका महिलेसाठी धावून आले आहेत.

कुत्र्यांच्या प्रामाणिकपणाबाबत तसं काही सांगायलाच नको. पण शक्यतो पाळीव कुत्र्यांनाच सर्व काही कळतं. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना फक्त माणसांच्या अंगावर धावून जायचं आणि चावायचंच माहिती असतं, असंच अनेकांना वाटतं. पण भटक्या कुत्र्यांचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिला तर माणसांचीही मान शरमेने खाली झुकेल.

हा एक सीसीटीव्ही व्हिडीओ आहे. जो आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता. एक महिला रस्त्याने चालते आहे. तेव्हा एक व्यक्ती तिच्या जवळ येते आणि तिची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न करते. रस्त्यावर तसं दुसरं कुणीच माणूस दिसत नाही. पण रस्त्याच्या कडेला मात्र एक कुत्रा झोपलेला आहे.

चोरट्याने पर्स घेताच महिला ओरडली आणि त्याचवेळी कुत्र्याला जाग आली आणि तो क्षणाचाही विचार न करता महिलेच्या दिशेने धावत सुटला. त्याच्यामागोमाग दुसरा कुत्रासुद्धा धावत येतो. दोघंही चोरट्यावर जोरात भुंकू लागतात. मग काय, चोरटा कसला तिथं उभा राहतो. तो गुपचूप आपला जीव मुठीत धरून तिथून पळ काढतो. महिलेच्या हातातील पर्स तिच्या हातातच राहते. चोरट्याची बाईक तिथंच जवळ उभी असते. तो आपल्या बाईकवर जातो आणि तिथून धूम ठोकतो.

या रस्त्यावर इतर कुणी माणूस नाही. पण असता तरी तो आपल्या जीवाच्या भीतीने पुढे गेला नसता, फक्त पाहत राहिला असता किंवा मोबाईल घेऊन व्हिडीओ काढत बसला असता. दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, छळ, कपट, लोभ, ईर्ष्या, भय हे माणसांमध्ये असतं. गरजूंच्या कामी येणं, काही चुकीचं होत असल्याचं दिसल्यास ते रोखण्याचा प्रयत्न करणं हे माणसांनी मुक्या जीवांकडून शिकायला हवं. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. कुत्र्यांच्या या हिंमतीला आणि कार्याला सर्वांनी दाद दिली आहे आणि त्यांना सलाम ठोकला आहे.


शेअर करा