‘ पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान विसरून जा ‘, मोदींना भाजप खासदाराचा घरचा आहेर

शेअर करा

पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग असून तो पुन्हा मिळवण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. जम्मू-काश्मीरचे अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे वळवणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. तसेच स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहन बलुचिस्तानमधून केले जात होते. मात्र, आता भाजपच्याच एका खासदाराने केंद्र सरकारला घरचा आहेर देत या दोन्ही गोष्टी आता विसरून जा, असे म्हटले आहे.

भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी ट्विटरवर कायम सक्रीय असतात. पाकिस्तानसंदर्भात भारत सरकारच्या धोरणावरून स्वामी यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

एका ट्विटर युझरने एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत स्वामी यांना टॅग करत भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून गेले पाहिजे, असे उत्तर स्वामी यांनी दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या युद्धाभ्यासावर स्वामी नाखुश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्वामी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.

अलीकडेच खासदार स्वामी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी मित्र गमावणे आणि शत्रूंमध्ये वाढ करणे कसे साध्य होईल, याच्या युक्त्यांवर पुस्तक लिहावे, असा टोला स्वामी यांनी लगावला होता. चीन आणि पाकिस्तानच्या धोरणांमुळे नेपाळ, भूटान आणि श्रीलंका यांसारखे मित्र गमावत चाललो आहोत, असा आरोप स्वामी यांनी केला होता.


शेअर करा