महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावला तर… काँग्रेस नेत्याचा सरकार सल्ला

शेअर करा

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे औरंगाबाद, बीड, नागपूर, जळगावमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण, लॉकडाऊन जर लावण्याचा निर्णय घेतला जात असेल तर बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रक्कमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिला आहे.

पुन्हा लॉकडाउन लागू होत असल्यामुळे अनेक काही ठिकाणी विरोध होत आहे, तर काही ठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा लॉकडाऊनच्या विरोधात भूमिका मांडली आहे.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. 2020 मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट  मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे, अशी चिंता चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे जर राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल तर आधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या, लॉकडाउनचा कालावधी कमीत-कमी ठेवा, असा सल्ला चव्हाण यांनी दिला.

तसंच, या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रक्कमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावा, परदेशातही असे करण्यात आले आहे. यासाठी प्रसंगी आमदार आणि खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा, असा सल्लाही चव्हाण यांनी दिला.

खाजगी वाहनातून प्रवासास मुभा देणे, शेतमाल तसंच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालु ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ नका, लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवणे गरजेचं आहे, असंही चव्हाण म्हणाले.

‘केंद्र सरकारने गेली वर्षी मार्चमध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाउन घोषित केले होते. सारासार विचार न करता घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला व भारतातील 3 कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.


शेअर करा