आय लव्ह यू म्हणाला आणि दुसऱ्या दिवशी रवानगी पोलीस कोठडीत, महाराष्ट्रात कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

महाराष्ट्रात रोड रोमिओंची काही कमी नाही . सरकारी यंत्रणेत लाख पळवाटा असल्याने अशा रोमिओंचे फावते आणि त्याचा त्रास मुलींना येता जाता सहन करावा लागतो, मात्र खरोखर जर एखाद्या मुलीने मनावर घेतले तर अशा रोडरोमिओला तुरुंगाची हवा खायला लागू शकते, याचा प्रत्यय नुकताच जळगाव येथील एका युवकाला आला.

मेडिकल दुकानावर औषध घेण्यासाठी जात असलेल्या १६ वर्षाच्या मुलीला रस्त्यात अडवून ‘आय लव्ह यु’ म्हणणाऱ्या अमृत उर्फ आबा सखाराम वाणी (३२, रा. इच्छा देवी चौक, जळगाव) या रोडरोमिओची रवानगी थेट पोलीस कोठडीतच झाली असून पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता दहावीत शिक्षण घेते. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता शामा फायर कॉम्लेक्समधील मेडिकल दुकानावर औषधी घ्यायला जात असताना अमृत उर्फ आबा वाणी याने तिच्याकडे पाहून ‘आय लव्ह यु’ म्हटला मात्र इतक्यावर न थांबता त्याने तिचा हातही पकडला. आपल्यासोबत असा प्रकार घडल्याने मुलगी प्रचंड घाबरली आणि घरी येऊन हा प्रकार आजीला सांगितला.

आजी व इतर नातेवाईकांनी तात्काळ अमृतचे घर गाठून जाब विचारला असता मी काहीच बोललो नाही असे सांगून हात वर केले. त्यानंतर पीडित मुलगी व तिच्या घरच्यांनी एमआयडीसी पोलीस गाठून तक्रार दिली आणि अमृत वाणी याच्याविरुध्द विनयभंग व बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायद्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर कॉन्स्टेबल अशोक सनगत, नितीन पाटील, लुकमान तडवी, इमरान बेग व शांताराम पाटील यांनी वाणी याचा शोध घेतला. रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले असून सध्या हा मजनू पोलीस कोठडीत आहे .


शेअर करा