‘ त्याच्या ‘ प्रेमात विवाहिता झाली इतकी पागल की केली स्वतःच्या घरात चोरी : महाराष्ट्रातील बातमी

  • by
चित्र प्रतीकात्मक

श्रीमंत घरातील मुली अथवा महिला हेरायच्या.त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. एकदा प्रेमाच्या जाळ्यात आल्या की मग आर्थिक अडचणीचे बहाणे बनवायचे किंवा इतर काही भूलथापा देऊन त्यांच्याकडून पैसे उकळवायचे अन गायब व्हायचे, असा क्राईम पॅटर्न असलेल्या अनिकेत बुबणे या युवकांविरुद्ध आता कोंढव्यातील एका तरुणीने तक्रार दिली आहे .

याआधी अनिकेत बुबणे याने बिबवेवाडी येथील एका धनाढ्य व्यावसायिकाच्या घरातील महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते .अनिकेत सुरेंद्र बुबणे (वय ३० ) हा रा. कृपा अपार्टमेंट,बालाजीनगर,धनकवडी येथील रहिवासी असून त्याने या महिलेला आपल्या प्रेमात इतके आंधळे केले होते की सदर महिलेने आपल्या घरात चोरी करून घरातील चक्क १ कोटी रुपये व दागिने चोरण्यास याला मदत केली होती, मात्र हे घबाड हाती लागताच बुबणे पसार झाला होता. त्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्याला अटक केली होती.

याच अनिकेतचा आणखी एक कारनामा बाहेर आला असून, त्याने कोंढवा येथील एका २८ वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले होते. ही तरुणी खासगी कंपनीत कामाला आहे. सोशल मिडियावरील एका साईटवर त्यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे ह्या तरुणीला देखील भूलथापा दिल्या. तिला देखील लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर आईचे आजारपण तसेच हॉटेल व्यवसायात तोटा झाल्याची बतावणी करुन तिच्याकडून ९३ हजार रुपये उकळले होते.

अनिकेत बुबणे याला पकडल्याचे या तरुणीला समजल्यानंतर तिने गुन्हे शाखेकडे येऊन तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे अधिक तपास करीत असून आता अनिकेत धरला गेल्याने आणखी काही महिला पुढे येतील अशी अपेक्षा आहे .