२ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार का ? : आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात..

शेअर करा

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनच्या उपाययोजना करण्याचे दिलेले आदेश, भाजपचा लॉकडाऊनला असलेला विरोध या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

टीव्ही ९ मराठी या वृ्त्तवाहिनीशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. सध्या २ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चा राजेश टोपे यांनी फेटाळून लावल्या आहेत. लॉकडाऊनसंदर्भात तुर्तास तरी चर्चा सुरु आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

लॉकडाऊनबाबत सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते. राज्यात ५० टक्के लॉकडाऊन लागणार, हे वृत्त देखील राजेश टोपे यांनी फेटाळून लावले पण सध्याची परिस्थिती पाहता कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्बंधाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. आम्ही लॉकडाऊन हा सर्वात शेवटचा पर्याय ठेवला आहे. शेवटी जीव वाचवायचा असेल तर लॉकडाऊन करणे भागच आहे, असा इशारा देखील राजेश टोपे यांनी दिला आहे

राजेश टोपे पुढे म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी नागरिक कमीत-कमी १५ दिवस गेले नाही, तर कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होऊ शकते. यासोबतच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. राज्यात बुधवारी कोरोनाच्या ३९ हजार ५४४ रुग्णांचे निदान झाले असून, तब्बल २२७ रुग्णांचा बळी गेला. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळापासून नोंद झालेला दैनंदिन मृत्यूंचा हा उच्चांक आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाख १२ हजार ९८० झाली असून, बळींचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाख ५६ हजार २४३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.


शेअर करा