नगर शहरातील भाजपच्या ३०-३५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल : काय घडले कारण ?

शेअर करा

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये जमावबंदी फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे की काय अशी जिल्ह्यात परिस्थिती आहे . आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाच्या वेळी लॉकडाऊन चे उल्लंघन झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपने देखील ‘ हम भी कुछ अलग नही है ” अशा थाटात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे .

शहरातील भाजप कार्यकर्ते विनय वाखुरे यांचा वाढदिवस होता.त्यानिमित्त सावेडीमधील प्रोफेसर कॉलनी चौकात मास्क वाटप करण्यात आले. यावेळी चौकात मास्क घेण्यासाठी जमलेल्या ३० ते ३५ जणांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढलेले वाखुरे यांनी १३ जून रोजी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तोफखाना पोलीस ठाण्यात विनय वाखुरे यांच्यासह अजय रासकर, संदीप चौधरी, महेश थोरात, मयुर कुलकर्णी व निखिल मोयल व इतर ३० ते ३५ जणांविरोधात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अजय गव्हाणे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मास्कचे वाटप करतेवेळी सोशल डिस्टंशिंगचे पालन करण्यात आले नाही शिवाय उपस्थित कार्यक्रम हाच मास्कच्या वाटपासाठी असल्याने जमलेले बहुतांश सगळेजण हे मास्क न लावताच उपस्थित होते . जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई आहे मात्र वाखुरे यांनी कुठलीही परवानगी न घेता, प्रोफेसर कॉलनी चौकात एकत्र जमून वाढदिवस साजरा केला.

दरम्यान, नगरमध्ये ५ दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी गर्दी जमवून वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवस साजरा करीत असताना त्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही करोना प्रतिबंधक उपाय योजनांकडे दुर्लक्ष केले होते. या प्रकरणी जगताप यांच्यासह त्यांच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपच्या विनय वाखुरे यांनी देखील गर्दी जमवत शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवली आहे .


शेअर करा