मुख्यमंत्र्यांचा जनतेशी आज संवाद , ‘ ह्या ‘ मोठ्या घोषणा करण्याचे संकेत

शेअर करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात उद्भवलेली कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनची शक्यता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, औरंगाबाद या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. त्यातच आज पुण्यात मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री संवाद साधणार आहेत. त्यावेळी ते महाराष्ट्रातील निर्बंधावर भाष्य करु शकतात. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही असं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच्या टास्क फोर्सच्या बैठकीत दिले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन नसेल, पण निर्बंध कडक लावले जातील, असं ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व विभागांचे मुख्य सचिव, कोविड १९ संसर्ग टास्क फोर्सचे वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील सद्यस्थिती, लॉकडाऊन, निर्बंध याबाबत मोठा निर्णय अपेक्षित आहे, तसेच जास्त प्रभावित असलेल्या शहरांमध्ये अंशतः लॉकडाऊनची घोषणा देखील केली जाऊ शकते.

मुख्यमंत्री कोणत्या घोषणा करु शकतात ?

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील निर्बंधाबाबत घोषणा करु शकतात. कोणत्या जिल्ह्यात काय निर्बंध असू शकतात याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगण्याची शक्यता आहे.
  • मुख्यमंत्री जिल्हानिहाय ऐवजी राज्यासाठी करण्यात येत असल्याच्या उपाययोजना सांगतील.
  • महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या रात्रीच्या जमावबंदीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. सध्या रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी आहे.
  • पुण्यात ज्याप्रमाणे दिवसा जमावबंदी आहे, त्याप्रमाणेच मुंबईसह महाराष्ट्र किंवा कोरोनाचा उद्रेक असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा जमावबंदी लागू होऊ शकते.
  • सर्व धार्मिक स्थळं काही दिवस पुन्हा बंद ठेवण्याची शक्यता आहे .
  • पुण्यात ज्याप्रमाणे बससेवा 7 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे, त्याप्रमाणे मुंबई लोकलमधील प्रवाशांवर निर्बंध येऊ शकतात.
  • मुंबईसह राज्यातील मॉल काही दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा होऊ शकते
  • राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा सुरु राहण्याची शक्यता आहे.
  • सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. त्या पार्श्वभूमीवर रक्तदानाचा आवाहन मुख्यमंत्री करु शकतात.

शेअर करा