नरेंद्र मोदी यांच्या छळाचे सुषमा स्वराज, अरुण जेटली बळी

शेअर करा

चेन्नई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छळ केल्यामुळे ज्येष्ठ नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा बळी गेला, असा वादग्रस्त आरोप द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी यांनी केला. अभिनेते आणि निर्माते असलेल्या उदयनिधी यांनी गुरुवारी धारापुरम येथे प्रचारफेरीचे आयोजन केले होते. त्याआधी मोदी यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष एल. मुरुगन यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. त्यावेळी मोदी म्हणाले होते की, उदयनिधी हे तर युवराज आहेत. या युवा नेत्याने राज्यातील अनेक अनुभवी नेत्यांच्या प्रगतीचा मार्ग रोखला आहे.

या पार्श्वभूमीवर उदयनिधी यांनी मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली. ते म्हणाले की, काल मोदी येथे आले होते आणि मी शॉर्टकट घेतल्याचा आरोप त्यांनी केला. हे कोण म्हणते आहे? आपल्याला ठाऊक आहे की गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी किती जणांना बाजूला टाकले ते…माझ्याकडे यादीच आहे.

यानंतर उदयनिधी यांनी लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांच्यासह स्वराज आणि जेटली यांची नावे घेतली. त्यानंतर त्यांनी वरील आरोप केला. ते म्हणाले की, सुषमा स्वराज नावाच्या एक व्यक्ती होत्या, ज्या मोदी यांच्या दडपणासमोर बळी पडल्या. अरुण जेटली नावाचे एक व्यक्ती होते, जे मोदी यांच्या छळामुळे मरण पावले.

मोदी यांनी व्यंकय्या नायडू यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनाही बाजूला केले असेही उदयनिधी पुढे म्हणाले. उदयनिधी हे राज्यात अनेक ठिकाणी प्रचारफेऱ्या काढत आहेत. त्यांनी सांगितले की, इ. के. पलानीस्वामी किंवा ओ. पनीरसेल्वम यांच्यासारखा मी मोदी यांना भीत नाहीच आणि त्यांच्याप्रमाणे मी मोदी यांच्यासमोर झुकणारही नाही. मी उदयनिधी स्टॅलीन आहे, कलैगनार यांचा नातू. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्या पडल्या. उदयनिधी हे चेन्नईतील चेपॉक मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. ते द्रमुक युवा आघाडीचे नेते आहेत.


शेअर करा