‘ आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच ‘ , देवेंद्र फडणवीस म्हणतात की ….

शेअर करा

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या संवादावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

राज्यात कोविड वाढत आहे. त्यामुळे पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी काय उपाययोजना करणार आहोत हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, हे सांगणं अपेक्षित होतं. पण मुख्यमंत्र्यांनी काल केवळ विरोधकांवर टोलेबाजी करण्यात आणि टीका करण्यात वेळ घालवला. कालचं भाषण काय होतं? कशासाठी होतं ? हेच कळलं नाही. कारण त्यात ना कोरोना वाढण्याबाबत भाष्य करण्यात आलं, ना उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. अपवादात्मक स्थितीत लॉकडाऊन करावा लागतो. पण तो नियम होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकाचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवं. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, त्या देशांनी काय पॅकेज दिलेत हे सुद्धा पाह्यलं पाहिजे.

जितेंद्र आव्हाडांना विस्मरणाचा रोग झाला आहे. राज्यातील जनतेला मदत न करणारं हे देशातील एकमेव सरकार आहे. केंद्र सरकारने 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. इतर राज्यांनीही पॅकेज जाहीर केलं. पण या सरकारने काहीच केलं नाही. उलट लोकांची वीज कापली आणि लोकांना त्रास दिला. कोविड काळात लोकांना त्रास देणारं हे एकमेव सरकार आहे.

फडणवीस यांच्या ट्विटरवरील पोस्ट्स

फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला…
पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…
हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…
डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…
पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…
ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत !
बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…
पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…
पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…
पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…
आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत…
पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय…
फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…
पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…
युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय…
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!
विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…
आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची…


शेअर करा