नगर हादरले..तोफखाना पोलीस स्टेशनमध्येच ब्लेडने व्यक्तीवर केले वार

शेअर करा

एकमेकांविरोधात वारंवार तक्रार करणाऱ्या दोघांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिसांनी बोलावले खरे, मात्र वाद मिटण्याऐवजी अधिकच गंभीर झाला. एका आरोपीने पोलिसांसमोरच दुसऱ्यावर ब्लेडने वार केले. त्यामुळे ठाणे अंमलदार कक्षातच एक जण रक्तबंबाळ झाला. पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेतले तर जखमीला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. राजू मुरलीधर काळोखे असे आरोपीचे नाव असून त्याने साहेबराव काते यांच्यावर हल्ला केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळोखे व काते यांच्यात पैशांवरून वाद आहेत. शुक्रवारी दुपारी काळोखे आणि काते यांच्यात वाद झाले होते. त्यावेळी हा वाद पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी दोघांच्याही तक्रारी घेऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. मात्र, प्रकरण मिटण्याची चिन्हे नव्हती. त्यामुळे शनिवारी तोफखाना पोलिसांनी या दोघांनाही प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस ठाण्यात बोलावले.

दोघेही समोरासमोर आल्यावर वाद पुन्हा चिघळला आणि तणाव वाढला. पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षात यासंबंधीचे कामकाज सुरू होते. बाचाबाची आणि दमबाजी वाढत जाऊन काळोखे याने सोबत आणलल्या ब्लेडने काते याच्यावर वार केले. यामध्ये काते जखमी झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करेपर्यंत आरोपीने सपासप वार केले. शेवटी पोलिसांनी हल्लेखोर काळोखे याला पकडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ पोलिस ठाण्यात धावपळ उडाली होती.

तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी काळोखे याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेण्यात आले. तर जखमी काते याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या दोघांमध्ये पैशाचा व्यवहार झालेला होता. पैसे वसुलीवरून वाद सुरू होता. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. मात्र आतापर्यंत अदखलपात्र गुन्हे घडलेले असल्याने पोलिसांनी फारसे गांभीर्याने न घेता दोघांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तयारी केली होती. ते कामकाज सुरू असतानाच हा गंभीर गुन्हा घडला.


शेअर करा