‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा ‘

शेअर करा

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मात्र गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही विरोधकांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरोदात्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत… त्यास सलाम ! सलाम !! सलाम !!!, असे भावनिक ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना धारेवर धरलं होतं. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटनंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह जितेंद्र आव्हाड यांना देखील टोला लगावला आहे

नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, जितेंद्र आव्हाड बरोबर बोलले. उद्धव ठाकरे बनणे अवघड आहे. कारण देव पण परत अशी चूक करायची हिंमत करणार नाही, अशी चूक एकदाच होते. महाराष्ट्राची वाट लावणे..महाराष्ट्र विकायला काढणे..कुटुंबापलीकडे नाही बघणे..म्हणजे महाराष्ट्र सांभाळणे म्हणतात, मग उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा आणि रोज उठून सलाम ठोकत बसा, असं टीकास्त्र नितेश राणे यांनी सोडलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. त्यानंतर भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. तर, इतरही विरोधकांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड खंबीर पाठीराखे बनून उभे राहिल्याचे पहायला मिळाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, सध्या रश्मी ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे आदित्य यांनाही कोरोनाची बाधा झालेली आहे . उद्धव ठाकरे यांची दोन वेळा एन्जिओप्लास्टी झाली आहे. त्यामुळे ते आपल्या प्रकृती विषयी पूर्वीपासूनच जागरूक आहेत. ते नियमित व्यायाम करतात. डॉक्टरांच्या सतत संपर्कात असतात. तर त्यांच्या ह्रदयात अनेक स्टोन्स असतानाही ते ज्या धीरोदात्तपणे महाराष्ट्र सांभाळतायंत, यावरुन आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना सलाम केला आहे.


शेअर करा