अखेर लॉकडाऊनच ? मंत्रिमंडळाच्या हाय व्होल्टेज बैठकीचा ‘ टाईम ‘ ठरला , निर्णयाची अपेक्षा

  • by

महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक शासन आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज रविवार 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनचा निर्णय यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध वर्गातील लोकांसोबत चर्चा करून लॉकडाऊन बाबत निर्णय घेण्याची तयारी करत असल्याचं दिसत आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याने कठोर निर्बंध लावण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येऊ शकतो.

आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर इतर कॅबिनेट मंत्री हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधील प्रमुख काही मंत्र्यांनी राज्यात संपूर्ण परत एकदा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करू नये, अशी भूमिका याआधीच मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे मात्र परिस्थिती पाहता काल काँग्रेसचा विरोध काहीसा मावळल्याचे चित्र होते त्यामुळे मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करतही आहोत. परंतु आजचे कोरोना नामक राक्षसाचे आक्राळविक्राळ रुप पाहिले तर आपण उभ्या केलेल्या आरोग्य सुविधा कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. आपण लॉकडाऊन टाळू शकतो त्यासाठी जिद्दीने आणि स्वयंशिस्तीने सर्वांनी एकत्र येत पुन्हा एकदा हातात हात घालून कोरोनाविरुद्ध लढूया असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

त्याचबरोबर दोन दिवसांत दृष्य परिणाम दिसले नाही तर सर्व तज्ज्ञ आणि संबंधितांशी चर्चा करून इतर पर्यायांची माहिती घेऊन नवीन कडक नियमावली जाहीर केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आजच्या बैठकीत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.