‘ ह्या ‘ व्हायरल फोटोची बच्चू कडूंकडून दखल,मुलाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू ..

  • by

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील एका आदिवासी पाड्यावर दोन दिवसांपूर्वी आग लागली. आगीत चार झोपड्या जळून खाक झाल्या. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मदतीला धावले. ते मोठ्या मंडळींचे सांत्वन करीत होते. मात्र, त्याचवेळी आगीत जळालेल्या आपल्या सायकलला बिलगून एक चिमुरडा रडत होता. घटनास्थळावरील कोणाचे याकडे फारसे लक्ष गेले नाही. मात्र सोशल मीडियात हा फोटा पाहून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मन हेलावले. त्यांनी या कुटुंबांना मदत तर दिलीच पण या चिमुरड्यासाठी नवीन सायकलही पाठवली आहे .

आगीत संसार जळालेल्या कुटुंबाचे दु:ख तर समजलेच पण सायकल जळाल्याने त्या चिमुरड्याला झालेल्या वेदनाही बच्चू कडू यांच्या लक्षात आल्या. कडू यांनी म्हटले आहे, ‘काल सोशल मीडियावर नगर जिल्ह्यातील या मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो दिसला. आगीमुळे घरातील साहित्यासोबत या मुलाची सायकलही जळून खाक झाली होती. प्रहारतर्फे त्या कुटुंबांना तात्पुरती मदत आणि त्या चिमुकल्याला नवीन सायकल दिली. या कुटुंबांना उभे करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करणार.’

अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या रखमाबाई पथवे यांच्या कुटुंबावर ही अपत्ती कोसळली. येथील ठाकर वस्तीला आग लागून त्यात चार झोपडीवजा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग लागली तेव्हा कर्ती माणसे कामावर गेली होती. माहिती मिळाल्यावर त्यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली तोपर्यंत सारे काही भस्मसात झाले होते.

त्यांच्या कुटुंबातील एक मुलगा आपल्या अर्धवट जळालेल्या सायकलला कवटाळून रडत होता. आग आणि मदतीची छायाचित्रे टिपली जात असताना हे दृष्यही चित्रित झाले. आग लागून झालेल्या नुकसानीची आणि मदतीची छायाचित्रे सोशल मीडियातही व्हायरल झाली. त्यातील मुलाचा सायकलसोबत रडतानाचा फोटो कडू यांच्या मनाला चटका लावून गेला.

माजी आमदार वैभव पिचड, पंचायत समितीच्या सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, सोमनाथ मेंगाळ, भरत मेंगाळ, सुरेश भांगरे, शंभू नेहे, दिनेश सहा, गटविकास अधिकारी डी. डी. सोनकुसळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घेतली. आगीत नुकसान झालेल्या कुटुंबांचे या सर्वांनी सांत्वन केले. त्यांना तातडीची मदत दिली आणि सरकारी मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.