अखेर राज्यात शनिवार- रविवार कडक लॉकडाऊन, जाणून घ्या काय सुरु काय बंद ?

 • by

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावला जाणार असून दर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लादले जाणार असून त्याबाबतच्या गाइडलाइन्स जारी केल्या जाणार आहेत. हे निर्बंध उद्या (५ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून लागू असतील. दरम्यान लोकलसेवा यापुढेही सुरूच राहणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाऊनबाबत गंभीरपणे विचार करण्यात आला व त्यानंतर एकमताने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुण्यात ज्याप्रकारे निर्बंध लावण्यात आले आहेत. तोच फॉर्म्युला राज्यात वापरण्याबाबत विचार करण्यात आला. राज्यात वीकेंडला कडक लॉकडाऊन असणार आहे.

येत्या शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी होईल. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर दिली. शनिवारी व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना पार्सल आणि टेक अवे सुविधा देण्याची परवानगी असेल. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागेल, असं मंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं. याबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कोविड विषयक निर्बंध अधिक कठोर करण्याचाही निर्णय झाला. हे निर्बंध उद्यापासून लागू केले जाणार असून आजच त्याबाबत गाइडलाइन्स जारी केल्या जाण्याची शक्यता आहे.

काय सुरू, काय बंद राहणार?

 • मॉल आणि दुकाने बंद राहणार
 • जीम बंद राहणार.
 • अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.
 • शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार.
 • खासगी कार्यालयांसाठी वर्क फ्रॉम होम बंधनकारक.
 • लोकल ट्रेन सुरू राहणार.
 • बस, टॅक्सी, रिक्षा सुरू राहणार.
 • सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहणार.
 • ब्युटी पार्लर, केशकर्तनालये बंद राहणार.
 • सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार.