मुंबई-पुण्यासह राज्यात भयावह परिस्थिती, पहा आजची आकडेवारी

  • by

राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच 222 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात दिवसभरात 27,508 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पण कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची परिस्थिती आहे .

पुणे शहरात आज नव्याने ६ हजार ६२५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ९० हजार ०४४ इतकी झाली आहे. शहरातील ३ हजार ७६२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ४२ हजार ६५२ झाली आहे.

मुंबईत देखील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून परिस्थिती एकदम गंभीर होत चालली आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 11 हजार 163 नवे रुग्ण आढळले तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतेय. मुंबईतील दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1.54 टक्क्यांवर पोहोचलाय. कदाचित हा पुढे आणखी वाढण्याचा धोका देखील आहे. मुंबई शहरात चार नवे हॉटस्पॉट तयार झालेत.

मुंबईत कोरोनाचे 4 नवीन हॉटस्पॉट आढळले आहेत. गोरेगाव, वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व – पश्चिम आणि चेंबूर असे नवीन विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत. यापैकी सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे अंधेरीत आहेत. सुरुवातीला चेंबूर, गोवंडी, वांद्रे या काही विभागांमध्ये रुग्णवाढ दिसून येत होती. आता पश्चिम उपनगरात अंधेरी ते बोरिवलीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येतेय .