नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा कोण आहे ?

  • by

छत्तीसगढच्या बिजापूर येथील जंगलात शनिवारी नक्षलवादी आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. या चकमकीत 22 भारतीय जवान शहीद झाले. तर 31 जवान जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय सुरक्षादलांवर नक्षलवाद्यांकडून झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यानंतर जवानांना घेरणारा हिडमा कोण आहे याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे .

चकमकीपूर्वी नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांना रणनीती आखून जंगलाच्या आतमध्ये येऊन दिले. 300 ते 400 नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांच्या एका तुकडीला चारही बाजूंनी घेरले. त्यानंतर भारतीय जवानांवर गोळीबार करण्यात आला. नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जाते.

कोण आहे हिडमा उर्फ हिडमन्ना?

कमांडर हिडमाविषयी भारतीय सुरक्षादलांकडे फारशी माहिती उपलब्ध नाही. सुरक्षादलांकडे असलेले त्याचे छायाचित्रही तरुणपणातील आहे. त्यामुळे कमांडर हिडमा आत्ता नेमका कसा दिसतो, हे कोणालाही माहिती नाही. मात्र, सुरक्षादलांच्या अंदाजानुसार कमांडर हिडमा साधारण 40 वर्षांची व्यक्ती आहे. हिडमाचे खरे नाव हिडमन्ना असून तो सुकमा जिल्ह्यातील पूवर्ती गावाचा रहिवासी आहे. तो पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा प्रमुख आहे. या दलात जवळपास 250 नक्षलवादी सामील आहेत. नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीमध्ये या हिडमाच्या गटाचा समावेश आहे.

अत्यंत कमी वयात हिडमा नक्षलवाद्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी एक झाला आहे. त्याचा वावर अत्यंत गुप्त असल्याने त्याच्याविषयी सुरक्षादलांकडे फारशी माहिती उपलब्ध नाही. कमांडर हिडमाला पकडण्यासाठी 40 लाखांचे इनामही घोषित करण्यात आले आहे. भीम मांडवी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही कमांडर हिडमावर आरोपपत्र दाखल केले होते. हिडमा हा नक्षलवाद्यांच्या PLGA बटालियन 1 चे नेतृत्त्व करतो. पामेड, कोंटा, जगरगुंडा, बासगुडा हा परिसर या बटालियनच्या अखत्यारित येतो.

सैनिकांना नक्षली कुठे लपले आहेत याची माहिती जाणीवपूर्वक पेरली जाते आणि सैन्य आत येताच घेरून त्यांच्यावर हल्ला केला जातो. याआधी देखील असे प्रकार घडलेले आहेत . कमांडर हिडमाच्या नेतृत्वाखाली या भागात 150 ते 160 नक्षलवादी छावण्या होत्या. हे नक्षलवादी कधीही सुरक्षादलांवर हल्ला करु शकतात, अशी माहिती होती. तरीदेखील मिळालेल्या माहितीचा स्रोत हा दिशाभूल करण्यासाठीच असल्या कारणाने ऐन वेळेला भारतीय जवानांचा घात झाला.

3 एप्रिल रोजी दुपारी सुकमा-बीजापूर बॉर्डवर जोनागुडा गावाजवळ माओवाद्यांनी अचानक हल्ला केला. ही चकमक जिथे झाली तिथून सुरक्षा दलाचे तर्रेम शिबीर अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे.नक्षलवाद्यांनी पाळत ठेवून हा हल्ला केला होता. 2010मध्ये ताडमेतला येथे आणि 2020मध्ये मिनपा येथे झालेल्या हल्ल्यासारखाच हा हल्ला होता.

माओवाद्यांच्या पीएलजीए बटालियन नंबर-1चं नेतृत्व कमांडर हिडमा करत होता. याच बटालियनने जवानांवर हल्ला केला. त्यात एकूण 180 नक्षलवादी होते. पामेड एरिया कमिटीचे नक्षलवादी पलटन, कोंटा एरिया कमिटी, जगरगुंडा आणि बासागुडा एरिया कमिटीचीही त्यांना साथ मिळाली होती. त्यामुळे या नक्षलवाद्यांची एकूण संख्या 250 झाली आहे.