मुलगा तर गेला मात्र शंकरराव गडाखांच्या ‘ ह्या ‘ मदतीने आईवडील भारावले…

  • by

नगर जिल्ह्यातील सोनई जवळच्या बालाजी देडगावच्या बारा वर्षीय भारतने शिक्षण घेवून खूप मोठा साहेब होण्याचे स्वप्न पाहिले खरे. मात्र त्याच्या स्वप्नांचे पंख कॅन्सर रोगाने हिरावून घेतले . ‘ भारत ‘ नावाच्या मुलाचा दहा दिवसांपासून सुरु असलेला लढा अखेर अयशस्वी झाला. शनिवारी (ता.३) च्या मध्यरात्री भारतचा कॅन्सरने बळी घेतला मात्र मुलाच्या मृत्यूनंतर रुग्णालय बीलाची अडचण जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सोडविल्याने कुटुंब व ग्रामस्थांनी मंत्री शंकरराव गडाख यांचे आभार मानले आहेत.

देडगाव (ता.नेवासे) येथील अल्पभुधारक शेतकरी अरुण जयवंत मुंगसे यांचा भारत हा एकुलता एक मुलगा. तो गावातीलच अहिल्याबाई होळकर विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता. घरची परिस्थिती जेमतेम असतानाही त्याच्यात शिक्षणाची मोठी जिद्द होती. कोरोना स्थितीमुळे बंद असलेल्या विद्यालयाबद्दल तो रोजच हळहळ करत होता.

अशातच भारताला कॅन्सरने गाठले. भारत हा चार महिन्यापासून आजाराने त्रस्थ होता. त्याच्या आजाराचे निदान पुण्याच्या केएम रुग्णालयात झाले. दहा दिवसापासून वडील अरुण, आई मिराबाई व चुलते सुभाष रुग्णालयात तळ ठोकून होते. त्यास आतड्याचा कॅन्सर झाल्याचे समजल्यापासून संपुर्ण कुटुंब व नातेवाईक चिंतेत होते. मला काहीच होणार नाही असे तो म्हणत होता. मात्र त्याचा हा विश्वास काळाने हिरावून घेतला. शनिवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला .

दवाखान्याचे तीन लाख रुपये बील आता कसे भरायचे हा प्रश्न सर्वांना पडला. एका नातेवाईकाने हा प्रसंग जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना सांगितला. गडाख यांनी तालुक्यात आरोग्यविषयी काम पाहत असलेल्या सचीन पवार यास सदर बील आरोग्य योजनेत बसविण्याची सुचना केली. त्याने सहायक धर्मदाय आयुक्तांकडे संपर्क केला. विशेष धर्मदाय आरोग्य फंडातून रकमेस मंजुरी देण्यात आली आणि प्रश्न सुटला .

बीलाअभावी उदभवलेला प्रसंग समजल्यानंतर मंत्री गडाख रात्रभर जागे राहून मदतीसाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या आरोग्य विभागाचे काम पाहत असलेल्या सचिन पवारला वेळोवेळी सुचना करत होते. सर्व पुर्तता पुर्ण झाल्या आणि आज पहाटे सहा वाजता मृतदेह ताब्यात मिळाला. शंकरराव गडाख यांच्या विशेष कार्याचे तालुक्यात कौतुक होत आहे.