..अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला राजीनामा

शेअर करा

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुखांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवारांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असं नवाब मलिक म्हणाले. सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रीपदाची सूत्रे मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे. नव्या गृहमंत्र्याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असंही नवाब मलिक पुढे म्हणाले.अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आणखी तीन याचिकावरही सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तात्काळ देशमुख यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.

मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.


शेअर करा