कोरोनाचा कहर..एकाच चीतेवर आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

राज्यभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. रोजचे रुग्णवाढीचे आकडे 50 हजाराच्या घरात पोहोचत आहेत. बीड जिल्ह्यात तर कोरोनाचा वाढता समूह संसर्ग उच्छाद मांडत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले, तरी परिस्थिती अद्याप आटोक्यात येत नाही. अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली.

अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या 8 जणांना अग्निडाग दिला. यामध्ये 1 महिला असून सर्व मयत रुग्ण 60 वर्षापुढील आहेत. मांडवा रोडवरील स्मशानभूमित हा प्रकार घडला. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये असणारे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि लोखंडी सावरगावच्या कोव्हिड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पेशंट्स आहेत. हा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. दररोज शंभरहून अधिक रुग्ण याठिकाणी भरती होत आहेत. मृत्यूदरही आधीपेक्षा अधिक झाला आहे.

अंबाजोगाई तालुक्यात 4 दिवसात 500 च्या आसपास रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र काही नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृतांचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णाच्या वाढत्या आकडेवारीला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसाचा लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. लॉकडाऊन काळात एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

बीड जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचे लॉकडाऊन करूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही. उलट रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी एका दिवसात तब्बल 716 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड शहर आणि तालुक्यातील 131 आणि अंबाजोगाईत 161 रुग्ण आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 28491 असून एकूण मृत्यू 672 झालेले आहेत तर 25436 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत तर अॅक्टिव्ह रुग्ण 4898 आहेत तर दुसरीकडे औरंगाबादच्या स्मशानभूमीत देखील जागा अपुरी पडू लागली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत मृतदेहांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे. जागा मिळेल तिथे नातेवाईक दाहसंस्कार करत आहेत. स्मशानभूमी अपुरी पडत असल्यामुळे जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार सुरू असल्याचं चित्र औरंगाबादेत आहे. एक चिता विझण्याआधीच दुसरी चिता पेटत आहे. कोरोना मृतांचा आकडा वाढल्यामुळे स्मशानभूमीतही मरणासन्न स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्येही अशीच भीषण परिस्थिती आहे. कोरोनाने सर्वत्र थैमान घातल्याने मृत्यूच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील तापीनदीच्या स्मशानभूमीत दररोज दहा ते पंधरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे शहरातील वखारीत लाकडाचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातून लाकडाचा साठा मागवून व्यवस्था केली जात आहे.

महाराष्ट्रात काल मंगळवारी 55,469 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झालेय. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31,13,354 झाली आहे. तर काल 297 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झालीय. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.81 टक्के एवढा आहे. राज्यात काल 34, 256 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज एकूण 25,83,331 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.98 टक्के एवढे झाले आहे.


शेअर करा