धोत्रे बुद्रुक येथील ‘ त्या ‘ महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले, धक्कादायक माहिती आली समोर

शेअर करा

नगर जिल्हा हत्याकांडाने हादरला असून पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक येथील पाईनच्या तलावात आढळलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात प्रशासनाला यश आले आहे . सदर महिलेचा खून हा ढवळपुरी इथे पतीनेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. महिलेला पतीने खून करून दगड बांधून पाण्यात फेकून दिले होते . नंदा पोपट जाधव ( वय २४ रा. चौधरीवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर ) असे या महिलेचे नाव असून पोपट मारुती जाधव ( रा. चौधरीवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर ) असे आरोपीचे नाव आहे .

उपलब्ध माहितीनुसार, धोत्रे बुद्रुक इथे तलावात दिनांक ३ एप्रिल रोजी एका अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले होते . याबाबत पोपट पंजाब गांगुर्डे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात खबर दिली होती. मृतदेहाला दगड बांधलेला असल्याने घातपात झाला हे स्पष्ट झाले होते, त्यामुळे त्याच दिशेने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.दरम्यान चौधरीवाडी ढवळपुरी येथील एक महिला बेपत्ता असल्याचे पथकाला समजले.

महिलेची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सदर महिलेच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेह तिचाच असल्याची खात्री केली आणि मयताचा भाऊ सुरेश सीताराम केदार यांच्या फिर्यादीववरुन पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता २९ मार्च रोजी पत्नी नंदा व तिचा पती पोपट जाधव यांच्या मध्ये वाद झाले असल्याची बातमी पुढे आली. पोलिसांनी पोपट जाधव यास ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली आहे .

पोपट जाधव याने पत्नी नंदा जाधव तिचा २९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता खून केला . ३० मार्चला पहाटे ५ च्या सुमारास मृतदेह दुचाकीला बांधला आणि दुचाकीवरून हा मृतदेह धोत्रे बुद्रुक येथील पाईनच्या तलावाजवळ आणला . मृतदेह पाण्यावर तरंगू नये यासाठी त्याने मृतदेहाला दगड बांधून पाण्यात फेकून दिला .

राहुरीत देखील दुपारी पत्रकाराचे अपहरण अन रात्री मृतदेह

नगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील मल्हारवाडी रस्त्यावरून (मंगळवारी) दुपारी सव्वाबारा वाजता अपहरण केलेल्या एका साप्ताहिकाच्या संपादकाला बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. काल रात्री पावणे अकरा वाजता राहुरी कॉलेज रस्त्याच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे ..

रोहिदास राधुजी दातीर (वय ४८, रा. उंडे वस्ती, राहुरी) असे मृत पत्रकाराचे नाव असून रोहिदास स्कुटीवर (एमएच १२ जेएच ४०६३) घरी चालले होते. पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या व्यक्तींनी त्यांना बळजबरीने गाडीत बसवून अपहरण केले. घटनास्थळी त्यांची दुचाकी व पायातील चपला पडल्या होत्या. काल दुपारी तीन वाजता रोहिदास यांच्या पत्नी सविता दातीर (वय ३९) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला.

तक्रार दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यात वाहन (एमएच १७ एझेड ५९९५) मधून अपहरण झाल्याचे दिसून आले. सदर वाहन हे कान्हू गंगाराम मोरे (रा. वांबोरी) यांच्या मालकीचे आहे. त्यानंतर अपहरण झालेले दातीर व वाहनमालक मोरे यांचे मोबाईल स्विचऑफ आढळून आले. काल सायंकाळी दातीर यांच्या पत्नीने पुरवणी जबाबात “मोरे यांनी यापूर्वी दातीर यांना मारहाण केली होती. कारभारी, रावसाहेब व बाळासाहेब मांगुडे यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.” असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार मोरे याचा मुलगा व इतर तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे .

तपास सुरु असतानाच काल रात्री पावणे अकरा वाजता दातीर यांचा मृतदेह राहुरी महाविद्यालय रस्त्यावर रोटरी रक्तपेढी जवळील रामदास पोपळघट यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये आढळला. मृताच्या गळ्याभोवती उपरणे व हाता-पायाला बेदम मारहाण केल्याचे दिसले. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, संगमनेरचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, शनि शिंगणापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल, उपनिरीक्षक गणेश शेळके, निलेशकुमार वाघ, निरज बोकील, श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक सानप, नगर येथील श्वान पथक, ठसेतज्ञ घटनास्थळी दाखल झाले..

घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपहरणातील वाहन रात्री नऊ वाजता आल्याचे पोलिसांना आढळले. नेमकी कोणत्या कारणासाठी हत्या केली, याचा तपास पोलिस करीत आहेत. मृताचे हात-पाय मोडले आहेत. जबर मारहाण करून, गळा आवळून खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. तीन-चार जणांनी अपहरण करून खून केला असण्याची शक्यता आहे. चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

रोहिदास दातीर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, स्टेशन रोड परिसरातील १८ एकरचा प्लॉट, नगर मनमाड रोडवरील एक हॉटेल इमारतीबाबत त्यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून रोखठोक लिखाण करून प्रशासनाला जागे केले होते. काही प्रकरणांचा खटला औरंगाबाद येथील न्यायालयात प्रलंबित आहे. यातील एखाद्या प्रकरणातूनच त्यांचे अपहरण आणि हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे


शेअर करा