मनोहर भिडेंचे अकलेचे तारे, कोरोना हा **** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग

  • by

कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांनी आज येथे केले आहे. सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. मनोहर भिडे याआधी देखील अशाच बाष्कळ वक्तव्यावरून कित्येकदा चर्चेत आले आहेत .

मनोहर भिडे म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे. मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्‍न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला अजिबात अक्कल नाही.’. पुढे बोलताना त्यांनी ‘ कोरोना हा गां** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे ‘ असे म्हटले. स्वतःला गुरुजी अशी उपाधी लावून भिडे यांची गलिच्छ असलेली भाषा आज पहायला मिळाली.

आम्ही सांगलीकर सह भाजपच्या नियोजनात आज सांगलीतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेवक शेखर माने आदी सहभागी झाले. त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. या बैठकीत मनोहर भिडे हे मास्क न लावता बसले होते. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी जवळपास सहा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.

नक्की काय म्हणाले मनोहर भिडे ?

  • अस्तित्वात नसलेले काळे मांजर काळ्या कूट अंधारात शोधण्यासारखा कोरोना रोगाचा प्रकार
  • कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे, प्रत्येकाच्या जीवाची काळजी जो तो घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये
  • कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा, कोरोना- कोरोना आक्रोश चालला आहे… पण कोरोना अस्तित्वात नाही, लॉकडाऊनची गरज नाही.
  • केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार…जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील
  • कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे, नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील. ( कसे राज्य करायचे याबद्दल मात्र भाष्य नाही )
  • कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे? मास्क लावण्याची गरज नाही

याआधीही केली आहेत बाष्कळ विधाने

राममंदिर सोहळा सुरु झाला त्यावेळी मनोहर भिडे यांनी रामाच्या मूर्तीला मिशी असावी अशी मागणी केली होती त्यावरून एका नव्या चर्चेला तोंड फुटले होते. मनोहर भिडे यांच्या वक्तव्याचा महंत सत्येंद्र दास यांनी चांगलाच समाचार घेतला होता ,’ प्रभू राम, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव हे हिंदू धर्मातील तीन प्रसिद्ध दैवत आहेत. या देवांना कधीही दाढी किंवा मिशी दाखवलेली नाही कारण या तिन्ही देवांना शोडवर्षीय दाखवण्यात आलं आहे. शोडवर्षीय म्हणजे 16 वर्षीय देव, हे तिन्ही देव जोपर्यंत पृथ्वीतलावावर असतील तोपर्यंत हे शोडवर्षीय राहतील’ अशा शब्दात मनोहर भिडे यांना फटकारले आहे. मनोहर भिडे यांची धारणा हिंदू धर्माच्या विरुद्ध असल्याचे देखील महंतांनी म्हटले होते.

मनोहर भिडे यांनी भलतीसलती वक्तव्य करू नयेत आणि कुठे जर रामाच्या मुर्तीला मिशा असतील तर त्या मनोहर भिडेसारख्या अज्ञानी लोकांमुळे, असं म्हणत सत्येंद्र दास यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे. आतापर्यंतच्या फोटोंमध्ये राम-लक्ष्मणाला मिशा नव्हत्या. आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम फोटोमध्ये दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिराच्या मूर्तीमध्ये तर मिशा असाव्यात, अशी अजब मागणी मनोहर भिडे यांनी केली होती.