नगरमध्ये मृतदेहांचा खच, कोरोना टेस्टिंग सेंटरच ‘ सुपर स्प्रेडर ‘ ठरण्याची भीती

  • by

कोरोना विषाणू संसर्गाचं भयानक रुप आता समोर येत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर सामुहिक संसर्ग होतोय. काही दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईमध्ये एका सरणावर 8 जणांवर अंत्यंसस्कार केल्याचं समोर आलं होतं. तसाच प्रकार अहमदनगरमध्येही समोर आला आहे. अहमदनगरच्या अमरधाममध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. तर काल दिवसभरात एकूण 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर येथील अमरधाम मध्ये असच ह्दयद्रावक चित्र समोर आलं असून अमरधाम मध्ये सरणावर एकाचवेळी 22 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभरात एकुण तब्बल 42 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच समोर आले आहे. अहमदनगर महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं आव्हानं उभं राहिलं होतं. शववाहिनीतून एकाचवेळी सहा मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर आली.

अहमदनगरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोनामुळे आत्तापर्यंत 1270 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने काल दिलेल्या आकडेवारीत मात्र केवळ 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. त्यामुळे संख्येचा ताळमेळ बसत नाही. अहमदनगर जिल्हयात सध्या 11 हजार 237 अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली. अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या 8 जणांना अग्निडाग दिला. यामध्ये 1 महिला असून सर्व मयत रुग्ण 60 वर्षापुढील आहेत.

टेस्टिंग सेंटरवरील गर्दीमुळे आणखी संसर्ग होण्याची भीती

नगर प्रशासनाने ठिकठिकाणी आयटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्टसाठी सेंटर उभी केली आहेत तसेच काही ठिकाणी लसीकरण केंद्रे देखील उभी केली आहेत मात्र प्रशासनाने इथे नागरिकांनी गर्दी करू नये याची दक्षता घ्यायला हवी तशी घेतली जात नाही. मोबाईलवर फोन करून वेळ देणे आणि त्यानंतर टेस्टिंगला बोलावणे हा पर्याय वापरला तर गर्दी टाळता येईल मात्र तशी कोणतीच यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिक कोरोना टेस्ट सेंटर आणि लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी करत आहेत.

कोरोना टेस्ट सेंटर आणि लसीकरण केंद्रावरच गर्दी होत असल्याने सोशल डिस्टंशिंगच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे .आमच्या प्रतिनिधीने सावेडी तहसील कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी भेट दिली असता सोशल डिस्टंशिंगचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनात आले आहे . पोलीस उपस्थित असून देखील ते देखील हतबल असलेले पहायला मिळाले.

रांग लावताना कोणतेच नियम व निकष पाळले जात नाहीत. केवळ टेस्टिंगसाठी म्हणून गेलेल्या धडधाकडं व्यक्तीला इतर बाधित रुग्णांमुळे देखील कोरोना होण्याची भीती निर्माण झालेली आहे . यावर तातडीने पावले उचलण्याची गरज आहे अन्यथा टेस्टिंगला म्हणून गेला नि कोरोना घेऊन आला अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे .