ऐकावं ते नवलच ..गुन्हेगारी कृत्यात माकडांचाही सहभाग, ‘ अशा ‘ रीतीने करायचे गुन्हे ?

  • by

चोरटे चोरी करण्यासाठी कोणती शक्कल लढवती याचा काहीच अंदाज लावता येणार नाही. काही चोरटे तर आता चोरीसाठी कल्पनेच्याही पलिकडच्या युक्त्या वापरताना दिसत आहेत. दिल्लीतील चोरट्यांची एक टोळी चोरीसाठी, लोकांना लुबाडण्यासाठी माकडांचा वापर करत असल्याचं उघड झालं आहे. या चोरट्यांनी माकडांना वापरुन अनेकांना लुबाडल्याचं समोर आलं आहे. या टोळीतील दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये तीन लोकांनी एका व्यक्तीवर पाळीव माकडं सोडले. त्यानंतर तिघांनी चारही बाजूंनी त्याला घेरलं. त्याला माकडांच्या चावण्याची भीती दाखवत त्याच्याजवळील 6000 रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर ते तिथून फरार झाले. पीडित तरुणाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पीडित तरुणाने चोरट्यांनी पाळीव माकडं आपल्या अंगावर सोडल्याची तक्रार केली.

पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला शहरातील सीसीटी तपासले जाऊ लागले. या तपासात शहरातील एका भागात दोन तरुण माकडांसोबत फिरताना दिसले. पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या आरोपींना जेरबंद केलं आणि ज्याला लुबाडले होते त्या व्यक्तीला देखील बोलावण्यात आले, त्या व्यक्तीने तात्काळ त्यांना ओळखले.

पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. या आरोपींमध्ये 26 वर्षीय बलवान नाथ आणि 23 वर्षीय विक्रम नाथ यांचा समावेश आहे. ते आपल्या तिसऱ्या एका सहकाऱ्यासोबत शहरातील लोकांना माकड चावेल याची भीती दाखवून लुबाडण्याचं काम करायचे. पोलिसांनी त्यांच्या जवळ असलेले दोन्ही माकडं सध्या वाईल्डलाईफ डिपार्टमेंटकडे सोपवले आहे. पोलीस आता तिसऱ्या आरोपीच्या शोधात आहेत.