‘ बिहारलाही लाजवेल ‘ शिवाजी कर्डिलेंच्या आरोपानंतर राहुरीत ‘ राजकारण तापले

  • by

राहुरीतील पत्रकाराच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात झालेले आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी फेटाळले असून माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते तात्काळ पोलिसांकडे सादर करावेत, अशी मागणी प्राजक्त तनपुरेंनी केली आहे .अहमदनगर जिल्ह्यातील ज्या भूखंडाच्या वादातून पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या झाली तो भूखंड प्राजक्त तनपुरे यांचा असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला होता

शिवाजी कर्डिले यांनी राजकारण म्हणून आरोप केल्याचा दावा प्राजक्त तनपुरेंनी केला होता .18 एकर भूखंडाबाबत दातीर आणि पठारे कुटुंबियात वाद होते. कर्डिलेंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे सादर करावेत तसेच पोलिसांनी योग्य तपास करावा, अशी भूमिका प्राजक्त तनपुरे यांनी मांडली आहे. ज्या भूखंडाचा उल्लेख करण्यात येत आहे ती जागा बाबुराव तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेने १९९२ मध्येच खरेदी केली आहे. सोहम प्रॉपर्टीज ही फर्म माझ्या मेहुण्याच्या नावे आहे. माझा मुलगा सोहम १४ वर्षांचा असून त्याचा संस्थेशी संबध नाही. मुख्य म्हणजे पत्रकार रोहिदास दातीर व या फर्मचा कोणताही वाद नव्हता. शिवाजी कर्डिले यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

शिवाजी कर्डिले यांनी नेमका काय आरोप केला?

पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची आम्ही इत्यंभूत माहिती घेतली आहे. यात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांनी ही हत्या केली. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली तेव्हा कळले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. आम्ही माहिती घेतली की ही कंपनी कोणाची आहे. तर असे आढळून आले की राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे ही कंपनी असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागिदार आहेत. दातीर यांना पठारे कुटुंबियांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही, असा आरोप कर्डिले यांनी केला. दातील यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यात यावी आणि दातीर यांच्या पत्नीला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करतानाच १५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल .

काय आहे प्रकरण ?

राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची 6 एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. रोहिदास दातीर यांचं राहुरी येथील मल्हारवाडी रोडवरुन दिवसा ढवळया अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची अमानुषपणे हत्या करुन त्यांचा मृतदेह शहरातील कॉलेजरोड परिसरात आणून टाकण्यात आला. मयत दातीर यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी देणे, हल्ला करणे असे प्रकार घडले होते या बाबत दातीर यांनी राहुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच आपल्या जीवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणीही वेळोवेळी केली होती .
शिवाजी कर्डीले यांच्या आरोपानंतर राजकारण तापले

अटकेतील आरोपीने दिलेल्या कबुली जबाबात राहुरी लगतच्या भूखंडाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या 18 एकर भूखंडाच्या उताऱ्यावर ज्यांची ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर कलम 302 चा गुन्हा दाखल करावा. तनपुरे कुटुंब हे नगरपालिकेच्या माध्यमातून जागांवर आरक्षण टाकून जागा बळकावण्याचे काम करत आहे. आधी भूखंडावर आरक्षण टाकायचे, नंतर तो भूखंड विकत घेऊन नंतर त्यावरचे आरक्षण उठवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करतानाच या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे याला अटक केल्यास या कटामागील मुख्य सूत्रधारांचा तपास लागेल, असं शिवाजी कर्डिले यांनी म्हटलं होतं .

पत्रकार दातीर यांनी राहुरी शहरातील महत्वाच्या ठिकाणी असलेल्या 18 एकरच्या या भूखंडाच्या खरेदी विक्री व ताब्याबाबत वेळोवेळी उपोषण केलं होतं. कोर्टातही गेले होते. तसेच बातम्यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावाही केला होता. या गुन्हयातील आरोपी कान्हू गंगाराम मोरेला राजकीय पाठबळ असल्याची शक्यता असून यापूर्वी संशयित आरोपी कान्हू मोरे याच्यावर 302 सारखे गंभीर गुन्हयांची नोंद आहे .

घटना घडण्यापूर्वी काही दिवस आरोपी कोणाच्या संपर्कात होते, संबधित खुनाचा कट कसा शिजला याबाबत संशयित आरोपीच्या मोबाईलचे सीडीआर तपासले जावेत तसेच मोबाईलचे लोकेशन तपासावे. अपहरण झाले त्यावेळी घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे, या प्रकरणी दातीर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वेगवेगळया याचिका दाखल केलेल्या आहेत. त्याबाबत चौकशी व्हावी व वादग्रस्त 18 एकर क्षेत्रावरील मालकी हक्क असणाऱ्या संबधित व्यक्तींचाही दातीर हत्याप्रकरणात सहभाग असल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

राहुरी येथील ही अठरा एकर जमीन एका शेतकऱ्याच्या नावाने होती. त्यावर नगरपालिकेने आरक्षण टाकले होते. मात्र हा भूखंड विकत घेतल्यानंतर त्यावरचं आरक्षण उठवण्यात आलं. त्यावर सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी असा बोर्ड टाकण्यात आला. या कंपनीची माहिती घेतली असता ती तनपुरे यांच्या मुलाच्या नावे असल्याचं आढळून आलं. त्यामुळे या जागेबाबत दातीर यांनी आवाज उठवून या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यामुळेच बहुधा दातीर यांची हत्या झाली असावी, असा संशय असून या प्रकरणातील सर्वांची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. देशमुख हा तनपुरेंचा मेव्हणा आहे. त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबतचे एक निवेदन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा निवेदन देणार असून त्यांनाही या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचं कर्डीले यांनी सांगितलं आहे . कर्डिले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आणि त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना या प्रकरणाची सर्व माहिती दिली.