नगर चौफ़ेरचा ग्राउंड रिपोर्ट, सरकारी आणि खाजगी आरोग्य यंत्रणेची शहरात काय परिस्थिती ?

  • by

नगर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना पेशंटची संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही. वीक एन्ड लॉकडाऊनला नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. सर्वच ठिकाणी पोलीस प्रशासनाला देखील नागरिकांचे अत्यंत चांगले सहकार्य मिळाले तर पोलिसांनी देखील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन अत्यंत नियोजनबद्ध अशी यंत्रणा राबवली .

पोलीस यंत्रणा उत्तम पद्धतीने काम करत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेने मात्र नगर शहरात मान टाकली आहे. आमच्या नगर चौफ़ेरच्या प्रतिनिधीने आज दि. १२ एप्रिलला शहरातील काही पॅथॉलॉजी लॅब तसेच हॉस्पिटलला भेट दिली तसेच महापालिकेकडून केल्या जात असणाऱ्या अँटीजेन ( नाकातून स्वाब टेस्ट १५ मिनिटात रिझल्ट, आधार कार्ड झेरॉक्स गरजेचे ) आणि आरटीपीसीआर ( घशातून स्वाब रिपोर्टसाठी २ दिवसांचा कालावधी , फक्त आधार कार्ड नंबर गरजेचा ) टेस्ट करणाऱ्या ठिकाणांना भेट दिली. महापालिकेकडून केल्या जात असणाऱ्या अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट केल्या जाणाऱ्या ठिकाणी अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळाली तसेच टेस्ट करण्याची वेळ देखील बहुतांश ठिकाणी सकाळी १०:३० ते ४ पर्यंतच असल्याने मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या .

अँटीजेन आणि आरटीपीसीआर दोन्ही टेस्टसाठी शासनाकडून कोणतेही शुल्क नसले तरी देखील टेस्ट करण्यासाठी नागरिकांना देण्यात आलेली वेळ ही कमी कालावधीची असल्याने लोकसंख्येच्या तुलनेत यंत्रणेवर ताण येत आहे. काही ठिकाणी टेस्ट साठी लागणाऱ्या किट देखील कमी प्रमाणात उपलब्ध होत्या त्यामुळे देखील टेस्ट बंद करण्याची नामुष्कीची आलेली आहे . आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी देखील चार दिवसांचा कालावधी लागत असल्याने या कालावधीत देखील संक्रमणाची भीती वाढली आहे .

सरकारी आरोग्य यंत्रणेची अशी परिस्थिती आहे तर दुसरीकडे खाजगी रुग्णालये आणि पॅथॉलॉजी लॅब तसेच डायग्नोस्टिक सेंटरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर कोरोनाची बाधा काय स्टेपला आहे ? यासाठी करण्यात येणाऱ्या एचआरसीटी टेस्टसाठी देखील नगरमध्ये निवडक ठिकाणीच ही सुविधा आहे तसेच त्या- त्या ठिकाणच्या मशीनची कॅपॅसिटी ही देखील वेगाने एचआरसीटी टेस्ट करण्यास मारक ठरत आहे . अँटीजेन रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर एचआरसीटी टेस्टसाठी साधारण दोन ते अडीच हजारापर्यंत शुल्क आकारत असल्याचे समोर आले.

नगर चौफ़ेरच्या प्रतिनिधीने सुरभी हॉस्पिटल, युनिटी डायग्नोस्टिक सेंटर ( झोपडी कॅन्टीन ) ,ग्लोबस डायग्नोस्टिक सेंटर ( लक्ष्मी उद्यान ) या ठिकाणी दुपारी २ वाजला भेट दिली असता सुरभी हॉस्पिटल मधील मशीनची कॅपॅसिटी संपलेली असल्याने एचआरसीटी टेस्ट करण्यास असमर्थता दाखवण्यात आली तर युनिटी डायग्नोस्टिक सेंटर इथे एचआरसीटी टेस्ट करणाऱ्या मशीनमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे कारण सांगण्यात आले. ग्लोबस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये टेस्ट सुरु होती मात्र इथेही अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळाली.

गर्दी टाळण्यासाठी ग्लोबस डायग्नोस्टिक सेंटर इथे कोणतेच नियोजन कुठेही व्यवस्थित आढळून आले नाही . सोशल डिस्टंशिंगचे सगळे नियम भेट दिलेल्या सर्व ठिकाणी धाब्यावर बसवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. वास्तविक पैसे भरून फोन करून नागरिकांना वेळेवर बोलावले तर काम सोपे होईल मात्र आपल्या लॅब किंवा हॉस्पिटल समोर लांबलचक रांगा पाहण्याची यांना काय हौस आहे की काय ? हे कळायला मार्ग नाही .

आता विषय राहिला मेडिकल स्टोअर आणि त्यात उपलब्ध असणाऱ्या औषधाच्या उपलब्धतेचा . अन्न आणि औषध विभागाने जिल्ह्यात रेमिडिसीवीर किंवा औषधाच्या बाबतीत काही अडचण असल्यास ८९७५६२४१२३ व ७०४५७५७८८२ हे दोन मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत . बहुतांश औषध विक्रेते नियमाला धरूनच काम करत आहेत मात्र प्रतिनिधीने भेट दिलेल्या पाईपलाईन रोडवरील एका दुकानात सर्व औषधे आमच्याकडून घेणार असाल तरच औषधे देऊ असे सांगून अडवणूक करण्याचा देखील प्रकार उघडकीस आला. त्याची रीतसर तक्रार आमच्या प्रतिनिधीने अन्न आणि औषध विभागाकडे दुकानाचे नाव, पत्ता व फोटोसहित केलेली आहे . त्यावर आता अन्न आणि औषध विभागाकडून काय कारवाई होते ते येत्या काळात पाहावे लागेल.

आरोग्य यंत्रणेनंतर बँकामध्ये देखील गर्दी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे . बँकांच्या बाहेरही लांबलचक रांगा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. बँक कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी फिल्म लावून काळजी घेतलेली पाहायला मिळाली मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या आरोग्याशी बँकांना काही घेणे देणे नाही, अशीच एकंदरीत परिस्थिती आहे . बँकांच्या कुठल्याच एटीएम मध्ये कोणतेच सॅनिटायझर किंवा बॉडी टेम्परेचर चेक करण्यासाठी काहीही यंत्रणा नाही . एटीएमच्या बटनावरून किंवा डोअर हॅण्डलवरून देखील कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे . सरकारच्या दिशा निर्देशाकडे बँकांनी पूर्णतः पाठ फिरवल्याचे आढळून आहे मात्र स्वतःच्या जीवासाठी मात्र ते योग्य ती काळजी घेत असल्याचे आढळून आले आहे .

गर्दी होणारी ठिकाणे टाळण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे हे अत्यंत गरजेचे आहे नाहीतर केवळ मंगल कार्यालये, हॉटेल्स बंद करून काही फायदा होणार नाही . आरोग्य विभागाने कडक पावले उचलून लॅब आणि हॉस्पिटल मध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्देश देणे गरजेचे आहे . जिथे मोकळी जागा आहे तिथे नागरिकांना ठराविक अंतर बसवून किंवा पैसे भरून घेतल्यावरफोनवर येण्याची वेळ देऊन हे सहज शक्य आहे मात्र त्या दृष्टीने ना हॉस्पिटल्स, ना लॅब्स आणि ना बँक कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही, त्यामुळे ही ठिकाणे देखील सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती निर्माण झालेली आहे .