अहमदनगर शहरानजीक ‘ ह्या ‘ हॉस्पिटलवर छापा, सुरु होता रेमडेसिविरचा काळाबाजार

  • by

नगरमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असताना देखील यात देखील नगरच्या हॉस्पिटल्स, लॅबकडून मनमानी पद्धतीने नागरिकांची पिळवणूक सुरु आहे . मुकी जनावरे कुणीही हाका, अशा न्यायाने नागरिक देखील ‘ अडला नारायण ‘ पद्धतीने मुस्कटदाबी सहन करत आहेत. व्हायरल इन्फेक्शनपासून काही काळ सुरक्षा देणाऱ्या रेमडेसिविरचा देखील काळाबाजार होत असून भिंगार शहरालगत वडारवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या म्हस्के हॉस्पिटल येथे सोमवारी रात्री पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी छापा घातला.

कोविड रुग्णासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा येथे काळाबाजार होत असल्याच्या संशयावरून ही कारवाई झाली. निर्धारित किंमतीपेक्षा जास्त दराने इंजेक्‍शन येथे विकले जात असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठाही आढळून आला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. म्हस्के हॉस्पिटलला कोविड केअर सेंटरच्या परवान्याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून झाली.

याप्रकरणी डॉ. किशोर म्हस्के याचासह चार जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रोहित पवार, प्रशांत आल्हाट या दोघांना अटक केली आहे. डॉक्टर दांपत्य डॉ. किशोर म्हस्के आणि डॉ.कौशल्या म्हस्के हे पसार झाले आहे. म्हस्के हॉस्पिटल येथील कोविड सेंटरमधून रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्यादराने विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे . अन्न आणि औषध विभागाने जिल्ह्यात रेमिडिसीवीर किंवा औषधाच्या बाबतीत काही अडचण असल्यास ८९७५६२४१२३ व ७०४५७५७८८२ हे दोन मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिलेले असून कुठेही चढ्या भावाने किंवा काळाबाजार किंवा औषध दुकानदार अडवणूक करत असेल तर या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे .

हॉस्पिटलमधील मेडिकलचे १४ हजार रुपयांचे बिल त्यांना मिळाले होते. त्यानुसार त्यांनी आज रात्री साडेदहा वाजता फौजफाट्यासह म्हस्के हॉस्पिटल येथे छापा घातला. या छाप्यात पोलिसांना मेडिकलमध्ये साठवून ठेवलेले रेमडेसिवीरचे १४ इंजेक्शन मिळाले आहेत. हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू आहे. त्यासाठी आयसीयू असल्याचे रुग्णांना सांगितले जात होते. परंतु तेथे ऑक्सिजनची कोणतीही व्यवस्था नसल्याचे पाहणीत समोर आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये येथे करोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा आकडा मोठा आहे. तशा तक्रारीही प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यातून या कोविड सेंटर विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. हे ६५ बेडचे हॉस्पिटल काही दिवसांपूर्वीच तीन मजली बांधण्यात आलेले आहे. रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला.