कोरोनाची अजून दोन लक्षणे आली समोर, अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये पाहिली गेली ही लक्षणे 

  • by

नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशभरात धुमाकूळ घातला आहे. चिंतेची बाब म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून, बाधित रुग्णांमध्ये नवनवी लक्षणेही दिसून येत आहेत. यापूर्वी खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे, चव आणि वास कळेनासे होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये दिसून येत होती मात्र आता या लक्षणांमध्ये अजून काही लक्षणांची भर पडली आहे.

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये काही अशी लक्षणे दिसून आली आहेत जी याआधी दिसून आली नव्हती. यामधील प्रमुख लक्षण हे तोंड कोरडे पडणे हे आहे. याला जेरोस्टोमिया असेही म्हटले जाते. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे लक्षण दिसून येऊ शकते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये रुग्णाला ताप आणि घसा दुखण्यासारखी लक्षणे दिसू लागतात. 

एका रिपोर्टनुसार कोरोनाच्या संसर्गाच्या नव्या लक्षणांमध्ये जीभ कोरडी पडणे हे लक्षणसुद्धा दिसून येत आहे. हे सुद्धा लाळ न बनण्याचे कारण असू शकते. यादरम्यान जीभ पांढरी पडू शकते किंवा त्यावर पांढरे डाग दिसू शकतात. ज्या रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसून येतात त्यांना जेवताना त्रास होतो. लाळ नसल्याने जेवण व्यवस्थित चावता येत नाही. तसेच बोलण्यामध्येसुद्धा अडचणी येतात. 

 डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शरीरामध्ये लाळ निर्माण करण्याची क्षमता कमी होणे हे तोंड सुकण्याचे मुख्य कारण असते. लाळेमुळे आपले तोंड धोकादायक जिवाणू आणि अन्य हानिकारक घटकांपासून वाचते. तसेच पचन क्रियेलाही मदत मिळते. तज्ज्ञांच्या मते जर सुरुवातीच्या काळात लक्षणांवर लक्ष ठेवले तर तपास आणि रुग्णावर उपचार करण्यामध्ये खूप मदत मिळू शकते. त्यामुळे संसर्ग पसरण्यापासून रोखता येऊ शकेल.