मृत्यूच्या दाखल्यावरही नरेंद्र मोदींचा फोटो छापा, राष्ट्रवादीचा हल्लाबोल

  • by

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना स्थिती हाताळण्यात केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. “केंद्राने मदत केली नाही तर औषध साठा जप्त करावा लागेल. योग्य नियोजन झाले नाही, तर हजारो मृत्यू होतील त्याला मोदी जबाबदार असतील” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. नवाब मलिक महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. रेमडेसिव्हीर इंजेक्शन असो किंवा ऑक्सिजनचा पुरवठा यामध्ये मोदी सरकार महाराष्ट्राला सहकार्य करत नसल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

“महाराष्ट्राला आज १४०० किलोलिटर ऑक्सिजनची गरज आहे. १२५० मेट्रीक टन ऑक्सिजनचे उत्पादन करण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. खासगी कंपन्याही महाराष्ट्राला सहकार्य करण्यास तयार आहेत, असे असताना केंद्र सरकारने स्टील प्लांटची उत्पादन क्षमता कमी करुन, ऑक्सिजन निर्मितीवर भर दिला पाहिजे” असे नवाब मलिक म्हणाले. “आम्हाला भिलाईमधून ऑक्सजिन साठा उचलण्याची परवानगी दिली आहे. पण भिलाई प्लाटंला महाराष्ट्राला ऑक्सिजन देऊ नका असे सांगण्यात आले आहे” असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

“मुख्यमंत्री सकाळपासून पंतप्रधानांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण संपर्क होऊ शकलेला नाही. देशात स्मशाभूमीत रांगा लागल्या आहेत. ऑक्सिजन नसल्यामुळे हॉस्पिटल्सची धावपळ सुरु आहे. मंबईत ऑक्सिजन कमी असल्यामुळे रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागत आहे. विरोधकांचं राज्य ज्या ठिकाणी आहे, त्यांना हैराण करण्याचा मोदी सरकारचा इरादा आहे?” असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला.

“युद्धजन्य परिस्थिती आहे. मोदी सरकारने मिलिट्रीच्या माध्यमातून ऑक्सिजन साठा पोहोचवण्याची व्यवस्था केली पाहिजे. हे फक्त आम्ही महाराष्ट्रासाठी नाही, तर गुजरात, केरळ, उत्तर प्रदेशातही तीच स्थिती आहे पंतप्रधानांनी परिस्थितीचा आढावा घेऊन, मिलिट्रीला कामाला लावण्याची गरज होती” अशी टीका नवाब मलिक यांनी केली. “करोना प्रतिबंधात्मक लसीची मात्रा घेतल्यावर दिल्या जाणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असतो, त्याचप्रमाणे आता कोरोनामुळे मृत्यू होत असताना, मृत्यूच्या दाखल्यावरही पंतप्रधानांचा फोटो छापा” अशा शब्दात नवाब मलिक यांनी आपला संताप व्यक्त केला.