काम बोलतय भाऊ..आमदार निलेश लंके यांनी पुन्हा करुन दाखवलं, कोरोना विरोधात मोठे पाऊल

  • by

महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी कोविड सेंटर उभारली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या नावाने उभारले 1 हजार बेडचं कोविड सेंटर दुसऱ्यांदा उभारलं आहे.

अहमदनगरला आमदार निलेश लंके यांनी दुसऱ्यांदा शरद पवारांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केलंय. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 खाटांच हे कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. यामध्ये शंभर ऑक्सिजन बेड आहेत. विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे.

आमदार निलेश लंके यांनी आवाहन केल्यानंतर 17 लाख रोख रक्कम आणि पाच टन धान्य जमा झाले आहे. तर, भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अशा विविध वस्तूंचं वाटप रुग्णांना करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच सर्वांनी काळजी घेण्याची आवाहनही निलेश लंके यांनी केलं आहे.

आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने यापूर्वी पारनेरमधील टाकळी धोकेश्वर इथं 1000 बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केले होते. त्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आलेली. त्या सेंटरमध्ये खास रुग्णांसाठी प्रोजेक्टर, मोबाईल गेम आणि कॅरम बोर्ड अशा अनेक गोष्टींची व्यवस्था करण्यात आली होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते (17 ऑगस्ट) त्याचे उद्घाटन करण्यात आले होते.