रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी, महाराष्ट्रात कुठे उघडकीस आला प्रकार ?

शेअर करा

देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांची प्रचंड ताणाताण होवू लागली आहे अशातच आता बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर तयार करून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विक्री करून मालामाल होण्याच्या या टोळीचा डाव पोलिसांच्या कारवाईमुळे फसला आहे . अशाही परिस्थितीत लोक नीचपणाची किती पातळी गाठत आहेत ते या निमित्ताने पुढे आले आहे .

देशासह राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर बनावट इंजेक्शनची विक्री होत असल्याची बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांना काहीजण या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली, आणि पोलिसांनी सापळा रचला.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते, पोलीस हवालदार राजेंद्र जाधव, पोलीस नाईक रमेश भोसले, दीपक दराडे, निखिल जाधव यांच्या पथकाने सापळा रचत पोलिसांनी बारामती शहरातील फलटण चौकात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखी माहिती घेतल्यास चौघांची टोळी या कामात सक्रिय असल्याची बाब समोर आलीय.

इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या प्रशांत सिद्धेश्वर घरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) आणि शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) या दोघांनी मुख्य सूत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती) आणि संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांच्या सहकार्याने हे इंजेक्शन विक्री करत असल्याची कबुली पोलिसांना दिली. यातील प्रशांत घरत आणि शंकर भिसे हे दोघे इंजेक्शन विक्री करत. तर विमा सल्लागार असलेला दिलीप गायकवाड हा या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून काम करत होता.

बारामतीसह परिसरातील विविध रुग्णालयात काम करणारा संदीप गायकवाड हा रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या आणि पॅकींग पुरवण्याचे काम करत होता. एका इंजेक्शनला 35 हजार रुपये एवढी किंमत ही टोळी वसूल करत होती. त्यांच्यावर भादंवि कलम 420/34, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, औषध किंमत अधिनियम यातील विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत.

या टोळीने अनेकांना हे इंजेक्शन विकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यानुसार या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आलीय. अन्न व औषध विभागानेही या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलीय. त्यामुळे यात आणखी कोणते आरोपी निष्पन्न होतात आणि त्यांनी कुणाकुणाला या इंजेक्शनची विक्री केली हे लवकरच समोर येणार आहे.


शेअर करा