फडणवीसांच्या तोंडात कोरोना विषाणू कोंबण्याची भाषा, शिवसेना आमदाराच्या अटकेची मागणी

  • by

करोनाच्या संकटात केंद्रातील व राज्यातील भाजप खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर असभ्य भाषेत टीका करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाला आहे. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी भाजपचे माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी केली आहे.

संजय गायकवाड यांनी आज भाजपवर जोरदार टीका केली. करोनाच्या काळात भाजप करत असलेलं राजकारण देशातच काय, जगातही कोणी करणार नाही. असलं राजकारण करताना यांच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. मला करोनाचे विषाणू सापडले तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, इतका तिरस्कार ह्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

गायकवाड यांच्या या टीकेला भाजपनंही प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध केला. ‘गायकवाड यांची वक्तव्ये हे विकृत आणि गलिच्छ मनोवृत्तीचं लक्षण आहे. गावातल्या एखाद्या मवाल्यासारखी त्यांची भाषा आहे. आमदार पदाला हे शोभणारं नाही,’ असा संताप संजय कुटे यांनी व्यक्त केला आहे.

गायकवाड यांच्या या वक्तव्याप्रकरणी भाजपच्या वतीनं सोमवारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार करण्यात येणार आहे. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्याची मागणी भाजप करणार आहे. गायकवाड यांना अटक होत नाहीत तोवर पोलीस ठाण्यापुढं ठिय्या आंदोलन केलं जाईल, असा इशारा कुटे यांनी दिला आहे.

माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही गायकवाड यांच्यावर तोफ डागली आहे. ‘गायकवाड यांनी गलिच्छ भाषेत टीका करून आपल्या बुद्धीचं दर्शन घडवलं आहे. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, अन्यथा भाजपचे कार्यकर्ते त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत,’ असं शिंदे यांनी म्हटलं आहे.