वेल्डिंगच्या दुकानात चक्क ‘ इतके ‘ ऑक्सीजन सिलिंडर होते लपवलेले, नगरमध्ये मोठी कारवाई

शेअर करा

नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वेल्डिंग दुकानावर धडक कारवाई करीत ५३ ऑक्सिजन सिलेंडर प्रशासनाने हस्तगत केले त्यात २७ भरलेले होते. त्यातील १५ जामखेड येथे देण्यात आले तर उर्वरित १२ येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्राणवायू संपून मोठा अनर्थ टळला आहे, अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. सदर दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत

सविस्तर वृत्त असे की , जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. ती झालेली कमतरता लक्षात घेता वेल्डिंग दुकांनदारांवर धडक मोहीम हाती घेण्यात आली. तालुका प्रशासनाने मिरजगाव, राशीन, कर्जत शहर परिसरात तीन पथकामार्फत प्रत्येक पथकात चार पोलिस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले.

या मध्ये कर्जत शहरासाठी मुख्याधिकारी गोविंद जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने व कर्मचारी, राशीन साठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व गट विकास अधिकारी अमोल जाधव, मिरजगाव शहरासाठी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमरजीत मोरे यांनी पथकाचे नेतृत्व केले.

या कारवाईत एकूण ५३ ऑक्सिजन सिलेंडर हस्तगत केली. त्यापैकी २७ भरलेले आढळले. जामखेड येथे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने तेथे तातडीने १५ सिलेंडर रवाना केले. तर उर्वरित भरलेले 12 उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे जमा केले आहेत.

नगरला ऑक्सिजनची टंचाई होती. तेथूनच कर्जत व जामखेड येथे पुरवठा होतो. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात 60 आणि जामखेड येथील 100 असे 160 रुग्णांना ऑक्सिजन वेळेत मिळाला नसता तर मोठा अनर्थ झाला असता. त्यामुळे नगर येथे साठा येईपर्यंत या मोहिमेतील ऑक्सिजनचा वापर करण्यात आला. ह्या निमित्ताने प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची एकजूट, कामाचे अचूक नियोजन, समनव्य, व नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी झाल्याने सदरची धडक मोहीम यशस्वी झाली आहे.


शेअर करा