मोदी अन् शहा दोघेही विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले ?

शेअर करा

पुणे : पंतप्रधान नरेंद मोदींनीच कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे असे जाहीर केले होते. आता तेच राज्यांवर जबाबदारी ढकलत आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांंनी नियोजन करून आपल्या देशाला कोरोना मुक्त केले. आपल्या प्रमुखाकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. त्यांनी लसी, ऑक्सिजन, आरोग्य सेवा यापैकी कशाचेही नियोजन केले नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सगळीकडे विनामास्क फिरतात त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले माहीत नाही, अशा शब्दात त्यांची खिल्ली देखील उडविली.

केंद्र सरकारने देशवासियांना कोरोना लस विनामूल्य उपलब्ध करून द्यावी  अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणारे निवेदन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांना दिले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 

पटोले म्हणाले, राज्य त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, मात्र केंद्र सरकार काहीही करायला तयार नाही. तसेच राहुल गांधी, मनमोहन सिंग दिल्लीत विरोधात असूनही केंद्र सरकारला कोरोना संदर्भात चांगले सल्ले देत आहेत आणि इथे महाराष्ट्रात विरोधी पक्ष मध्यरात्री दमणवरून रेमडेसिविर आणण्यात गुंतले आहेत, अशी टीका पटोले यांनी महाराष्ट्र भाजपावर केली. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत आहे ती करण्याची ही वेळ नाही. आता कोरोनाविरोधात लढायला हवे. पण तिथल्या चुका लक्षात येऊ नयेत,यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई केली जात आहे, असा आरोप पटोले यांनी केला. 

राज्यातंर्गत प्रवासाला बंदी,कोरोना लशींचे वितरण ही सगळी केंद्र सरकारची जबाबदारी आहे. लशींचे सगळे अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत.केंद्र सरकारने भारताचा शत्रू  देश असलेल्या पाकिस्तानला कोरोना लस फुकटात पुरवली आहे, असा आरोप करताना राज्य सरकारने केंद्राकडे परदेशातून लशी आयात करण्याची परवानगी मागितली आहे, अशी माहिती पटोलेंनी दिली.


शेअर करा