रुपाली चाकणकरांना सुजय विखेंचे ‘ अगदी रोखठोक ‘ उत्तर , पहा काय म्हणाले ?

  • by

‘ नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्लीहून आणलेल्या बॉक्समध्ये नेमके काय होते ? त्यांनी ही इंजेक्शन खरंच आणली असतील तर ती कोठे आणि कोणाला वाटली हे जाहीर करावे,’ अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना डॉ. विखे यांनी उत्तर दिले आहे. त्यांचे नाव न घेता डॉ. विखे म्हणाले की, ‘ माझी बांधिलकी नगर जिल्ह्याशी आहे. येथील लोकांना उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे. जिल्ह्याबाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला मी याचे उत्तर देणे लागत नाही.’

गेल्या आठवड्यात डॉ. विखे यांनी दिल्लीहून एका खासगी विमानातून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून नगर जिल्ह्यातील रुग्णालयांना दिली. त्यांनी स्वत:च तसा एक व्हिडिओ प्रसारीत केला. यावर शंका घेणारे ट्विट चाकणकर यांनी केले होते. ‘सध्या जनता सैरभर झाली आहे. अशा परिस्थितीत जनतेची चेष्टा करू नये. त्यामुळे विखे यांनी ज्या पद्धीने इंजेक्शन्स आणल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल केला, त्याच पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ करून जनतेची चेष्ठा करणे थांबवावे,’ असे चाकणकर यांनी म्हटले होते.

कर्जत तालुक्यातील आढावा दौऱ्याच्यावेळी बोलताना विखे यांनी चाकणकर यांचे नाव घेता आपली भूमिका करताना विखे म्हणाले , ‘नगर जिल्ह्याने विखे कुटुंबियांना पन्नास वर्षे साथ दिली आहे. आम्ही फसवाफसवी केली असती तर लोकांनी आम्हाला अशी साथ दिली नसती. सध्या रेमडेसिविर बाबत जे राजकारण सुरू आहे, त्यामध्ये माझी जबाबदारी ही केवळ नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. मी जे काय उत्तर द्यायचे ते त्यांना देईल. या जिल्ह्यातील जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी विचारले तर मी त्यांना उत्तर देईल.

‘ नगर जिल्ह्याच्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मुळात मी जो व्हिडिओ प्रसारित केला, त्यातच सर्व स्पष्ट केले आहे. व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर लक्षात येईल. किती इंजेक्शन्स आणली याबाबत उल्लेख नाही. त्यामुळे मी कोठे गेलो होतो, काय केले, त्या बॉक्समध्ये काय आणले, याबद्दल कोणीही टिप्पणी करू नये. ज्यांना शंका आहे, त्यांनी थेट बोलावे, मी व्यक्तीश: उत्तर देईन. मात्र माझी बांधिलकी ही माझ्या नगर जिल्ह्यापुरती आहे. ’ असेही विखे म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

कोरोना संकटात इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना अहमदनगरचे भाजप खासदार डॉ सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा मोठा कोटा नगरमध्ये आणला होता . सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली. तब्बल 10 हजार इंजेक्शन्स त्यांनी नगरकरांसाठी आणली होती . नगरकरांसाठी ही एक गुड न्यूज होती मात्र यात देखील राजकारणाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळत आहे.

सुजय विखे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली होती . “ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती. माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही. मी फॅक्टरीत गेलो . तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही ‘ असेही सुजय विखे पुढे म्हणाले होते.