जिवंत कोरोना रुग्णाच्या समोर मृतदेहाचे पॅकिंग पाहूनच पेशंट्सचा ऑक्सिजन होतोय कमी, नगरमधील गंभीर प्रकार

  • by

नगर जिल्हा रुग्णालय इथे कोरोना वॉर्डमध्ये चक्क जिवंत असलेल्या तसेच सीरियस असलेल्या कोरोना रुग्णांच्या समोरच कोणताही पडदा न लावता कोरोना बाधीत मृतदेहाचे पॅकिंग केले जात असून आपल्या डोळ्यादेखत काल परवा पर्यंत श्वास घेत असलेल्या व्यक्तीवर अशी वेळ आलेली पाहून जिवंत कोरोना रुग्ण देखील धास्तावलेले पाहायला मिळत आहे . अशा गंभीर प्रकाराने कोरोना रुग्णाचे मनोधैर्य आणखी खचत असून रुग्णाच्या मानसिकतेवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडत आहे .

नगर चौफेरच्या प्रतिनिधीने कोरोना वॉर्ड स्टेप ३ जिल्हा रुग्णालय इथे भेट दिली असताना सदर गंभीर प्रकार उघडकीस आला. कोरोना रुग्णाचा मृत्यू होताच तात्काळ तेथून हलवणे गरजेचे असूनही काही तास मृतदेह पडून ठेवला जातो तसेच कोरोना बाधीत मृतदेहाचे पॅकिंग करताना चक्क जिवंत रुग्णाच्या समोरच व्यक्तीच्या अंगावर सॅनिटायझर मारून प्लास्टिक पिशवीत बॉडी पॅक केली जाते.

नगर चौफेर प्रतिनिधीच्या समोरच हा प्रकार घडला. कोरोना बाधीत मृतदेहाचे पॅकिंग करताना बेडच्या भोवती पडदा लावून मग पॅकिंग केले जावे जेणेकरून इतर रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे . मुळातच कोरोना झाल्यावरच लोक अत्यंत घाबरून जात आहेत त्यात त्यांच्या समोरच कोरोना बाधीत मृतदेहाची अशी विल्हेवाट पाहून बहुतांश जिवंत व्यक्तींचा देखील ऑक्सिजन कमी होत आहे .सरकारी पातळीवर यांचे काही आदेश आहे का ? यावर देखील रुग्णालयांनी व्यवस्थित माहिती घ्यावी तसेच किमान इतर रुग्णाचे मनोधैर्य खचणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. सर्व रुग्णालयांना अशा प्रकारचे आदेश सरकारी पातळीवर देण्यात यावेत जेणेकरून कोरोना रुग्णांची मानसिकता आणखी ढासळणार नाही .