लिफ्टमध्येच ऑक्सिजन संपल्याने नगर चौफेर संपादकाच्या वडिलांचा मृत्यू , जाणून घ्या सद्य परिस्थिती

  • by

नगर चौफेर संपादकांचे वडील हे जिल्हा रुग्णालयात दाखल होते. ऑक्सिजन बेडवर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना डॉक्टरांनी व्हेंटीलेटरवर ठेवण्याचा सल्ला दिला मात्र व्हेंटीलेटर उपलब्ध झाला नाही. दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर व्हेंटीलेटर उपलब्ध झाला मात्र रुग्णाला स्ट्रेचरवर घेऊन जाताना लिफ्टमध्येच फक्त दुसऱ्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आणतानाच बॅक अप म्हणून असलेल्या ट्रॅव्हल ऑक्सिजन सिलेंडरमधीलही ऑक्सिजन संपला त्यामुळे लिफ्टमधून बाहेर येताच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या व्यक्तींचा देखील बेजबाबदारपणा या घटनेतून उघड झाला आहे . सदर कर्मचारी लोड जास्त असल्याचे कारण पुढे कारण जबाबदारीपासून पळ काढत असल्याने एकतर कनिष्ठ स्तरावर जबाबदार व्यक्तीना नेमणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा होण्याऱ्या घटना टाळता येतील.

दुसऱ्या एका घटनेत तारकपूर येथील रहिवासी असलेली एक महिला ( वय ४५ ) काही दिवसांपासून स्टेप ३ बिल्डिंगमध्ये ऑक्सिजन बेडवर ऍडमिट होती. महिलेच्या प्रकृतीत देखील सुधारणा होत होती मात्र महिलेच्या शेजारील एका वृद्ध रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आणि त्यानंतर सदर मयत व्यक्तीचे कोणताही पडदा न लावता प्लस्टिकच्या पिशवीत केलेले पॅकिंग महिलेने पाहिले व त्याचा धसका घेतला आणि अचानक महिलेचा ऑक्सिजन ड्रॉप झाला. सदर महिलेला व्हेंटीलेटर देखील उपलब्ध झाला मात्र तरीदेखील महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाला नाही आणि अखेर दोनच दिवसात दिवसात तिचा मृत्यू झाला. रुग्णाच्या समोर असे केले जाणारे पॅकिंग पाहूनच निम्मे रुग्ण त्याचा धसका घेत असून त्याने देखील पेशंटच्या मानसिकेवर नकारात्मक प्रभाव पडत आहे .

ऑक्सिजन बेडवर ऑक्सिजन देणाऱ्या व्लाव्ह देखील काही प्रमाणात सदोष असून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे . सेट केलेली ऑक्सिजन पातळी ही कायमस्वरूपी सारखी राहत नाही तसेच ह्युमिडीफायर जोडलेल्या ठिकाणी देखील काही प्रमाणात लिकेज होते त्यामुळे देखील रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तर डॉक्टर एकदा तेवढी पातळी सेट ठेवून जे जातात ते परत फिरकत देखील नाहीत आणि सिस्टर तेवढीच पातळी ठेवली पाहिजे असे सांगत रुग्णाच्या नातेवाईकांना दमदाटी करत राहतात. कोरोना रुग्णांना मानसिक पातळीवर आधार देण्यात देखील काही डॉक्टर्स कमी पडत आहेत. रुग्णांशी भाषा सौम्य ठेवली तर त्यांचे मानसिक स्वास्थ चांगले राहील मात्र काही डॉक्टर्सला ह्याचा विसर पडलेला दिसत आहे . वडिलांच्या वयाच्या रुग्णांना देखील अरे तुरे करून काही डॉक्टर्स त्यांच्याकडे जणू हे रुग्ण म्हणजे आपल्यावर भार असल्यासारखे वागत असल्याने रुग्णांच्या मानसिकतेवर देखील नकारात्मक प्रभाव पडत आहे .

नगरमधील सर्व हॉस्पिटल्समध्ये दाखल करून घेताना वयाचा विचार करूनच दाखल करून घेतले जात आहे यामध्ये चक्क सिव्हिल हॉस्पिटलचा देखील समावेश आहे . काही नागरिक देखील सिव्हिल हॉस्पिटलकडे शेवटचा पर्याय म्हणूनच पाहतात मात्र वृद्ध व्यक्तींना देखील ऑक्सिजन बेडपासून व्हेंटिलेटरपर्यंत जर दुसरा रुग्ण नसेल तरच वृद्ध व्यक्तींना ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिला जात आहे. वृद्ध व्यक्तींमध्ये आजाराचे प्रमाण जास्त असल्याने तसेच वृद्ध व्यक्ती दाखल करून घेतल्यामुळे जर दगावला तर आपल्या हॉस्पिटलचे नाव खराब होईल या भीतीपोटी देखील खाजगी रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. रुग्णास दाखल करून घेण्याआधी रुग्णाचे वय, त्याचा एचआरसीटी स्कोअर आणखीन काही आजार याचा विचार करूनच प्रवेश दिला जात आहे . नगर चौफ़ेरच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून सदर बाब ही त्यांच्या कानी घालण्यात आलेली आहे तसेच वरती उल्लेखलेल्या दोन्ही घटना देखील सांगण्यात आल्या आहे.