फॅक्ट चेक : नाकात लिंबाचा रस टाकल्यास कोरोना जातो का ? जाणून घ्या सत्य

  • by

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव देशात वेगानं पसरत आहे. दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यातच आरोग्य व्यवस्थेचा उडालेल्या बोजवाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर कोरोना संबधित मेसेजवर लोकं डोळं झाकून विश्वास ठेवत आहे. त्याची शहनिशा किंवा सत्य न पडताळता विश्वास ठेवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोरोनामुक्त होण्यापासून अथवा त्यापासून वाचवण्यासाठी अनेक मेसेज व्हायरल होत आहे. यात शरीरातील ऑक्सिजनची पातळीवाचवण्यापासून कोरोनामुक्त होण्यापर्यंतचे उपाय देखील सुचवत असतात.

सध्या सोशल मीडियावर लिंबूच्या रसाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये लिंबाच्या रसाचे दोन-तीन थेंब नाकात टाकल्यावर कोरोना विषाणू (COVID-19) मरतो अथवा संपुष्टात होतो, सांगण्यात येत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर वेगाने पसरत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं दावा केलाय की, लिंबाच्या रसाचे दोन-तीन थेंब नाकात टाकल्यानं कोरोना संपुष्टात येईल. कोरोनावर मात करण्यासाठी हा रामबाण उपाय असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पीआयबीनं याबाबत स्पष्टीकरण देत लोकांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे.

PIB नं व्हिडिओची सत्यता पडताळली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लिंबाच्या या व्हिडिओत कोणतेही सत्य नसल्याचं पीआयबीला दिसून आलं आहे. पीआयबीने सोशल मीडियावर हा व्हिडिओला खोटा आणि चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, लिंबाचा रस नाकात टाकल्याने तुमच्या शरीरात असलेला कोरोना नष्ट होतो, असं कोणतंच वैज्ञानिक प्रमाण नाही. अशा व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवू नका.

यापूर्वीही सोशल मीडियावर असे बरेच उपाय व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवण्याआधी सत्यता पडताळून पाहावी जेणेकरून भविष्यात सरकारच्या आणि नागरिकांच्या आणखी अडचणी वाढणार नाहीत.