इतिहास घडला..कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघात 30 वर्षांनंतर सत्तांतर : वाचा पूर्ण बातमी

  • by

गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीमुळे अख्ख्या कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघालं होतं. आता गोकुळ दूधसंघावर जवळपास तीन दशकांनंतर सतेज पाटलांच्या पॅनेलनं विजय मिळवलाय. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनेलला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. अखेर या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या पॅनेलनं विजय मिळवत दबदबा निर्माण केला आहे.

तीन दशकांनंतर कोल्हापुरात दूध संघात परिवर्तन झालंय. या निवडणुकीत राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीनं बाजी मारली असून, गोकुळमध्ये अखेर सत्तांतर झालंय. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला 17 जागांवर विजय मिळालाय. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय. या निमित्तानं आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आलीय.

गोकुळ दूधसंघातील 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीसाठी 3650 पात्र सभासद होते, मात्र दुर्दैवाने यातील तिघांचा मृत्यू झाला. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू होती. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता निवडणुकीचा स्पष्ट कौल हाती आलाय. सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान देत विजय संपादन केला आहे .