विना टेस्ट कोरोना रिपोर्ट ५०० रुपयात देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, आरोपी धरला

  • by

जिल्हा बंदी,राज्य बंदी असल्याने पर जिल्ह्यात आणि राज्यात जाणाऱ्या व्यक्तींच्यासाठी रुग्णांच्यासाठी ई-पाससाठी कोरोना टेस्ट आवश्यक असल्याने अश्या व्यक्तींना विना टेस्ट कोरोना रिपोर्ट देण्याच्या उद्योगाचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मिरजेच्या सिनर्जी हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याकडून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी स्वप्नील बनसोडे याला अटक करण्यात आली असून प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे .

कोरोनाची गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.असाच एक प्रकार सांगलीच्या मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये समोर आला आहे. हॉस्पिटल मध्ये आय टी विभागात सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या स्वप्निल बनसोडे कडून विना टेस्ट कोरोना रिपोर्ट देण्यात येत असल्याचा प्रकार सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून उघडकीस आणला आहे.

जिल्हा बंदी,राज्य बंदी असल्याने पर जिल्ह्यात आणि राज्यात जाणाऱ्या व्यक्तींच्यासाठी रुग्णांच्यासाठी ई-पाससाठी कोरोना टेस्ट आवश्यक असल्याने अश्या व्यक्तींना विना टेस्ट कोरोना रिपोर्ट देण्याचा उद्योग स्वप्नील बनसोडेकडून सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानंतर पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून रिपोर्ट हवा असल्याची मागणी केली असता बनसोडे याने प्रती रिपोर्ट 500 रुपयांचा मागणी केली होती.

पोलिसांनी बनसोडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ,त्याने आता पर्यंत 2 विना टेस्ट कोरोना रिपोर्ट ई-पास आवश्यक असणाऱ्या आणि मयत रुग्णांना देण्यात आल्याची कबुली दिली असुन या प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करून या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गांभीर्य लक्षात घेवून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

सांगली जिल्ह्याला ऑक्सिजन काठावर मिळत असून प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.