अलर्ट..नागपुरात आढळलेले कोरोनाचे 5 म्युटेशन भयावह , शरीराला ‘ असे ‘ देतात चकवा

  • by

एकीकडे दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या नागपुरकरांच्या चिंतेत भर घालत असतानाच, नागपूरात कोरोना व्हायरसमध्ये 5 प्रकारचे म्युटेशन आढळून आले आहेत.कोरोना व्हायरसमध्ये झालेलं हे म्युटेशन खूप धोक्याचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण नेमके कोणते म्युटेशन आढळून आले आहेत आणि ते कसे धोक्याचे आहेत, ते आपण आता समजून घेऊयात.

राज्याच्या उपराजधानीत 70 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह कोरोनारुग्ण आहेत, तर दररोज 5 हजारावर नवीन रुग्णांची नोंद होतेय. आणखी चिंतेची गोष्ट म्हणजे, नागपुरात कोरोनाचे 5 म्युटेशन झालेले स्ट्रेन्स आढळून आलेत. नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रवींद्र खडसे यांनी बीबीसीशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला आहे.

नागपूरमध्ये आढळलेले कोरोनाचे 5 स्ट्रेन्स

महाराष्ट्रात विदर्भातून फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पसरायला सुरूवात झाली. अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदा कोरोनाचा म्युटेशन झालेला विषाणू सुक्ष्मजीवशास्त्रज्ञांना सापडला होता.

3 नमुन्यांमध्ये E484K आणि E484Q म्युटेशन आढळून आलं.
2 कोरोनाग्रस्तांमध्ये N440K स्ट्रेन मिळाला.
26 नमुन्यांमध्ये E484K आणि L452R हे डबल म्युटेशन सापडलं.
7 सॅम्पलमध्ये L452R हा म्युटेशन झालेला स्ट्रेन आढळून आला.

म्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणजे विषाणूच्या रचनेत बदल होणं. विषाणूच्या दोन जनुकात बदल झाल्याने याला ‘डबल म्युटेशन’ म्हंटलं जातं. शरीरातील रोगप्रतिकारशक्तीला हे म्युटेशन चकवत असल्याने संसर्ग तीव्रतेने पसरतो. कोरोना व्हायरसमध्ये झालेलं म्युटेशन खूप धोक्याचे आहेत. यामुळे खूप जास्त फंगल इंन्फेक्शनचे आजार होत आहेत. हा म्युटंट कहर पसरवतोय. कोव्हिड न्यूमोनिया सोडून इतरही आजार या म्युटंटमुळे होत असल्याने धोक्याचे प्रमाण जास्त आहे.

E484Q एस्केप म्युटेशन आहे. स्पाईक प्रोटीनमध्ये म्युटेशन झाल्याने शरीरातील अॅंटीबॉडी या बदललेल्या विषाणूला कमी प्रमाणात ओळखतात. L452R अत्यंत तीव्रतेने पसरणारं म्युटेशन आहे. पहिल्यांदा हे म्युटेशन अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आढळून आलं. त्यानंतर जगभरात हा नवीन स्ट्रेन संशोधकांना सापडला. E484K म्युटेशन यूकेमध्ये आढळून आलेल्या व्हायरसमध्ये पहिल्यांदा आढळून आलं. याची संसर्गक्षमता 70 टक्के असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात N440K म्युटेशन आढळून आलं आहे. इतर म्युटेशनसारखंच हे एस्केप म्युटेशन आहे. जगभरातील 16 देशात हा नवीन स्ट्रेन सापडला आहे.