‘ ज्या ‘ पतीला वाचवण्यासाठी लता करे अनवाणी पायाने धावल्या त्याच …

  • by

ज्याचा जीव वाचविण्यासाठी जिवाचे रान केले, अनवाणी पायाने नऊवारी लुगडे नेसून मॅरेथॉनमध्ये सहभागी होत पारितोषिक पटकावले, त्या जिवानेच अखेरचा श्वास घेतला अन् एका जिद्दी माऊलीची धावच थंडावली. अनवाणी पायाने पतीवरील उपचारासाठी मॅरेथॉनमध्ये धावून पैसे गोळा करणा-या आणि त्यांच्यावरील चित्रपटात स्वत: भूमिका साकारणाऱ्या लता करे यांचे पती भगवान करे यांचे मंगळवारी (ता. 4) कोरोनाने निधन झाले.

आर्थिक अडचणीमुळे कसलाही पाठिंबा नसताना वयाच्या 67 व्या वर्षी लता करे यांनी केवळ उपचारासाठी बक्षीसाची रक्कम कामाला येईल या उद्देशाने बारामतीत झालेल्या मॅरेथॉनमध्ये भाग काय घेतला. त्यांना प्रथम क्रमांक काय मिळाला आणि त्या एका रात्रीत प्रसिध्दी काय पावल्या. सगळेच एखाद्या चित्रपटात शोभावे असेच झाले. कडाक्याच्या थंडीत धावल्या आणि पुढे सलग तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेत त्यांनी ज्येष्ठांच्या श्रेणीत विजेतेपदाची हॅटट्रीक साधली.

हा प्रवास इथवरच थांबला नाही तर या जिद्दी माऊलीवर ए चित्रपट करायचे दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी निश्चित करुन चित्रपटाची निर्मिती केली, नविन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यातही विशेष म्हणजे लता करे यांची भूमिका स्वताः लता करे यांनीच साकारलेल्या या मराठी चित्रपटास राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार देखील मिळाला.

गेल्या सात आठ वर्षात लता करे अनेक मॅरेथॉनमध्ये धावल्या व त्यांनी बक्षीसेही मिळवली पण कोरोनाच्या संकटातून पतीला बाहेर काढण्यात मात्र लता करे यांना अपयश आले. ज्या पतीसाठी इतकी वर्षे मेहनत केली त्या पतीचेच निधन झाल्याने लता करे व कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीत उपचार सुरु असताना भगवान करे यांचे निधन झाले. लता करे यांना औषधोपचारासाठी राष्ट्रवादीच्या शहर महिलाध्यक्षा अनिता गायकवाड यांनी मदतीचा हात देऊ केला होता, मात्र कोरोनाने या सर्वांच्या प्रयत्नांवर मात करत भगवान करे यांना हिरावून नेले.