बुधवार पेठ, प्रेयसी आणि पोलीस कर्मचाऱ्याची हत्या ? धक्कादायक माहिती आली समोर

  • by

पुणे पोलीस दलातील फरासखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी समीर सय्यद यांची रात्री कुख्यात गुन्हेगार प्रवीण महाजन याने गळा चिरून हत्या केली, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवीण महाजनला फरासखाना पोलिसांनी अटक केली. हा सगळा प्रकार किरकोळ वादातून झाला असल्याचं पोलिसांकडून रेकॉर्डवर नोंदवण्यात आले आहे. मात्र या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत समीर सय्यद यांची मंगळवारी रात्री 1 वाजता प्रवीण महाजन यांनी चाकूने गळा चिरून हत्या केली. प्रत्यक्षात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या एका महिलेच्या वादातून हा खून झाल्याचं कळतं आहे. पोलीस हवालदार समीर सय्यद हे आरोपी महाजन याच्याशी प्रेमसंबंध असलेल्या महिलेला संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यावरून महाजन आणि सय्यद यांच्यात दीड महिन्यापूर्वी जोरदार वादावादीही झाली होती. तोच राग डोक्यात धरून महाजन याने सय्यद यांचा खून केला, असल्याची चर्चा पोलीस दलात आहे. न्यूज १८ लोकमत ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पोलीस दलाकडून मात्र पोलिसांची इभ्रत वाचवण्यासाठी पोलिसांनी या हत्येला रेकॉर्डवर किरकोळ वादाच स्वरूप दिलं आहे. सदर महिलेच्या तपासाबाबत पोलिसांना विचारणा केली असता ती मिळून येत नसल्याची सारवासारव पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, फरासखाना पोलीस स्टेशन यांनी करायचा प्रयत्न केला. पण मयत पोलीस कर्मचाऱ्याचे प्रताप त्यांनी देखील माहित नसल्याचे सांगितले आहे .

पोलीस कर्मचारी देहविक्री करणाऱ्या महिलांना त्रास देतात आणि हे प्रकरण पोलीस कर्मचाऱ्याच्या खूनापर्यंत जातं आणि तरीही वरिष्ठ दुर्लक्ष करतात आणि खून झाल्यानंतर प्रकरणाची सत्यता उघड होऊ नये यासाठी प्रयत्न करतात हे दुर्दैवी आहे. पुणे पोलिसांनी सापेक्ष भूमिका घेणं गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे पोलीस दलातील अशा प्रवृत्तींना आळा घालणं ही गरजेचं आहे.

श्रीकृष्ण टॉकीजवळ काय घडलं?

फरासखाना पोलीस स्टेशनचे कर्मचारी समीर सय्यद (वय 48) हे बंदोबस्त आटोपून घरी चालले होते. सय्यद हे खडक पोलीस लाईनमध्ये राहायला होते. सय्यद हे श्रीकृष्ण टॉकीजवळ पोहोचले असता प्रवीण महाजनने याने त्यांच्यावर हल्ला केला आणि चाकूने गळा चिरला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून प्रवीण महाजनला अटक करण्यात आली आहे. प्रवीण महाजन हा एक वर्षासाठी तडीपार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.