ब्लॅकमेलर लेडी डॉन प्रीती दासचा ‘ आणखी ‘ एक कारनामा आला बाहेर, घेतली होती इतकी रक्कम

शेअर करा

प्रीती दास हिने आतापर्यंत कित्येक जणांची फसवणूक केलेली असून ब्लॅकमेलिंगचे एक संपूर्ण रॅकेट तिने उभे केले होते . जरीपटका पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध एकाला २५ हजारांनी लुबाडण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तिने भरोसा सेलच्या नावाखाली एका व्यक्तीला धमकावून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार उकळले होते, अर्थात हा फक्त एक गुन्हा असून आणखी देखील काही लोक आता पुढे येऊ लागले आहेत . प्रितीने आपल्या कौशल्याचा वापर करून अनेक पोलीस कर्मचारी व राजकारणी आपल्या खिशात ठेवले होते मात्र तिचे दिवस फिरताच आता तिच्या पाठीराख्यानी देखील तिच्याकडे पाठ फिरवली आहे .

झाले असे की, नागपूरच्या जरीपटका पोलीस हद्दीतील इंदिरा माता टेकडी गोंड मोहल्ला, नागपूर येथे राहणाऱ्या पूर्णाबाई समाके यांचा मुलगा वायुसेनेत नोकरीवर आहे.त्याचे काही दिवसापूर्वी लग्न झाले होते मात्र नवविवाहिता आणि सासू यांच्यात वाद होत होते. सासूला वैतागून अखेर नवविवाहितेने भरोसा सेलमध्ये पती व सासूविरुद्ध तक्रार केली. तक्रार दाखल होताच प्रीतीला यामध्ये संधी दिसली आणि तिने पूर्णाबाई यांचे घर गाठले. घर गाठून आपली ‘ पहूंच ‘ खूप लांबपर्यंत असून तुमच्या मुलाची वायुसेनेतली नोकरी मी घालवू शकते . जर असे नको असेल तर गुपचूप २५ हजार रुपये द्या, अशी मागणी केली होती. तिच्या ह्या मागणीनंतर पूर्णाबाई यांनी प्रीतीला 25 हजार रुपये दिले होते, तो देखील गुन्हा तिच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे .

प्रीती दासने गंडा घालण्यासाठी तसेच वसुली करण्यासाठी डुबऱ्या अमित, पत्रकार शीतल, प्राजक्‍ता बंगाली, रवी आणि शारीर ट्रेलर अशी ब्लॅकमेलर गॅंग बनविली होती. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांच्या मार्गदर्शनात संबंधिताने तक्रार दिली होती .प्रीती दासच्या ह्या टोळीने आतापर्यंत शेकडो धनिकांना जाळ्यात ओढले आणि खंडणी स्वरूपात लाखो रुपये उकळले. प्रीती दासची टोळी गुन्हे दाखल होईपर्यंत तिच्यासोबत होती मात्र आता टोळीतील सर्व पंटर गायब झाले आहेत .

प्रीती कायद्याच्या कचाट्यात अडकताच तिच्या सर्व पाठीराख्यानी तिची साथ सोडली आहे त्यामुळे तिने, ” हम तो डुबेंगे सनम तुमको भी लेकर ” अशा खास शब्दात फोनवर तिच्या पाठीराख्यांना धमकी दिल्याची देखील चर्चा आहे . कित्येक राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना प्रितीने आपल्या कौशल्याने आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून लाखोंनी लुटल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रीतीकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याने इभ्रतीचा “भाजीपाला’ होऊ नये म्हणून कोणताही राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकारी प्रीतीच्या ब्लॅकमेलिंगबाबत शब्दही बोलायला तयार नाही इतकेच काय तर इलेक्ट्रॉनिक मीडिया देखील ह्या विषयावर जास्त बोलायला तयार नाही .

सुनील पौनीकर या युवकाच्या पत्नीला देहव्यापारात ढकलून धंदा करवून पैसे वसूल करेल अशी धमकी प्रीतीने चक्क दोन पोलिसांच्या उपस्थितीत दिली होती. हा अपमान सहन न झाल्याने पौनीकरने आत्महत्या केली. याप्रकरणी तब्बल सहा महिन्यानंतर प्रीतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला होता. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना प्रीती दासला लगेच जामीन मिळाल्याने पोलिस आणि सरकारी वकिलाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लकडगंज पोलिस “मॅनेज ‘ झाल्याची चर्चा शहरभर आहे.


शेअर करा