
‘फक्त देशी दारूने करोना बरा होता, असा आपला दावा नाही. आपण केवळ आपला अनुभव सांगितला आहे. यात कोणाचीही दिशाभूल करण्याचा आपला उद्देश नाही. तथापि आपण आपली यासंबंधीची पोस्ट मागे घेत असून टास्क फोर्सने मान्यता देईपर्यंत कोणीही देशी दारूचा प्रयोग करू नये,’ असे म्हणत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी आपला दावा मागे घेतला आहे.
प्रशासनाकडून आलेल्या चौकशीच्या नोटिसीला त्यांनी उत्तर दिले असून संबंधित पोस्टही मागे घेतली आहे. ‘यानंतरही कोणी असा उपचार केला, तर होणाऱ्या परिणामांना तुम्हीच जबाबदार राहाल,’ असा इशाराही त्यांनी नागरिकांना दिला आहे. तीन दिवसांपूर्वी डॉ. भिसे यांनी एक पोस्ट लिहून करोना रुग्णाला काही दिवस दररोज ६० मिलीलीटर देशी दारू पाजल्यास करोना लवकर बरा होता असा दावा केला होता. आपण हा प्रयोग ५० रुग्णांवर केल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. आरोग्य विभाग आणि प्रशासनानेही याची दखल घेऊन डॉ. भिसे यांना नोटीस पाठविली. या नोटिशीला डॉ. भिसे यांनी उत्तर दिले आहे
डॉ. भिसे यांनी म्हटले आहे की, ‘देशी दारूमुळे करोना बरा होतो, असा दावा आपण केलेला नाही. नेहमीची ॲलोपॅथिक औषधे आणि प्रमाणित मात्रेत अल्कोहोल सेवन केल्यास करोना रुग्ण बरा होतो, असा अनुभव सांगितला आहे. या आजाराबाबत आपण कोणाचीही दिशाभूल केलेली नाही. मात्र, श्वसन संस्थेच्या आजारावर अल्कोहोल उपयुक्त ठरते, याला आयुर्वेदात शास्त्रीय आधार आहे. सरकारने करोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे आणि सुचनांचे संपूर्ण पालन करत आहे. जोपर्यंत शास्त्रीय कसोट्यावर टास्क फोर्स हा विषय पडताळून पहात नाही, तोपर्यंत माझे अनुभव मी सार्वजनिक माध्यमातून काढुन टाकत आहे. हे अनुभव माध्यमावर टाकण्याचा माझा हेतू निर्मळ आणि शुद्ध होता. माझे शास्त्रीय अनुभव वरिष्ठ तज्ञ समिती समोर मांडण्यास मला संमती द्यावी,’ असेही डॉ. भिसे यांनी उत्तरात म्हटले आहे.
सद्यस्थितीत भिसे यांनी सोशल मीडियातील आपली मूळ पोस्ट काढून टाकली असून आणखी एक नवी पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘आपण सर्वांना सांगू इच्छीतो की मी फक्त देशी दारूने करोना बरा होतो, असा दावा केलेला नाही. ज्या रुग्णांवर मी हा प्रयोग केला, त्यांच्यावर सरकारने प्रमाणित करून दिलेले उपचारही सुरू ठेवले होते. करोनावर उपचार म्हणून अल्कोहोलचा वापर करण्यास तज्ज्ञांनी अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कोणीही आपल्या रुग्णाला माझ्या त्या पोस्टप्रमाणे अल्कोहोल देऊ नये. त्यासाठी कोविड टास्क फोर्सची परवानगी आवश्यक आहे. ती मिळविण्यासाठी मी प्रयत्न करीन. माझ्या त्या पोस्टचा गैरअर्थ काढून कोणी अपप्रचार करून व्यसनाचे किंवा दारूचे समर्थन करू नये. डॉक्टरांचा सल्ला न घेता चुकीचा उपचार स्वत:च्या मनाने केला तर होणाऱ्या परिणामाला तुम्ही स्वत: जबाबदार असाल, याची नोंद घ्यावी,’ असेही डॉ. भिसे यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
करोना रुग्णांवर उपचारासाठी योग्य मात्रेतील देशी दारूचा वापर उपयुक्त ठरत असल्याचा दावा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरूण ताराचंद भिसे यांनी केला होता. सोमवारी त्यांनी यासंबंधीचा अनुभव सांगणारी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती तसेच या उपचाराने पन्नास रुग्ण आपण बरे केल्याचा दावादेखील त्यांनी केला होता . ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक चौकशी सुरु केली होती.
डॉ. भिसे यांचे बोधेगावमध्ये सिताई हॉस्पिटल आहे. आयुर्वेद शास्त्रातील (बीएएमएस) वैद्यकीय पदवी असलेले डॉ. भिसे अनेक वर्षांपासून येथे सेवा देत आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपला अनुभव शेअर केला. त्यांची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. त्यामध्ये डॉ. भिसे यांनी म्हटले आहे की, मी आज खूप जबाबदारी व प्रामाणिकपणे तसेच जड अंत:करणाने माझा अनुभव तुमच्यासमोर हिमतीने मांडतोय. मला यातून प्रसिद्धी किंवा पैसा दोन्ही कमवायचे नाही. याचे श्रेय डॉ. आर. के. संघवी व माझ्या एका अशिक्षित रुग्णाला जाते. एका रुग्णाच्या मुलाने आपल्याला हा अनुभव सांगितला, असं भिसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होत..
एप्रिल महिन्यात बेड मिळत नसल्याने या महिला रुग्णाला घरीच ठेवण्यात आले. डॉक्टरांनी रुग्णाचा सीटीसी स्कोअर जास्त असल्याने व्हेंटीलेटरची अवश्यकता सांगितली होती. मात्र, सोय न झाल्याने रुग्णाला घरीच ठेवले. साठ वर्षांच्या या महिलेवर घरगुती काढे व उपाय सुरू झाले. कोणी तरी सल्ला दिला म्हणून रुग्णाला ६० मिलीलिटर देशी दारू दिली. ती घेत्यानंतर रुग्णाला भूक लागली. असेच काही दिवस रोज थोडी थोडी दारू दिली आणि रुग्ण बरा झाला. हा अनुभव ऐकल्यानंतर आपण शोध सुरू केला. इंटरनेटवर बरीच माहिती मिळाली. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने दारू हे करोनावरील उपयुक्त औषध नसल्याचे स्पष्ट केले होते, हे पाहून हिरमोड झाला. मात्र, याकडे दुर्लक्ष करून आपण थेट रुग्णांवरच प्रयोग करण्याचे ठरवले, असंही त्यांनी म्हटलं होते.
पोस्टमध्ये पुढे लिहताना भिसे म्हणतात, ‘ रुग्णांची संमती घेऊन सुमारे पन्नास जणांवर असा उपचार केला. त्यातील दहा रुग्ण गंभीर स्वरूपाचे होते. या रुग्णांवर सरकारी नियमांप्रमाणे उपचार सुरू ठेवलेच त्यासोबत दररोज सकाळी सायंकाळी ३० मिलीलीटर देशी दारू दिली. याचे चांगले परिणाम दिसून आले असून जवळपास सर्व रुग्ण बरे झाले. यासंबंधी तज्ज्ञांना समोर योग्य त्या पुराव्यांनिशी बाजू मांडण्याची आपली तयारी आहे. सतत दारू पिणे आरोग्यासाठी घातक आहे. मात्र, औषध म्हणून ते सात ते दहा दिवस द्यायचे आहे, यातून आपल्याला दारूच्या व्यसानाचे समर्थन करायचे नाही, असेही डॉ. भिसे यांनी म्हटले होते . ‘डीआरडीओ’च्या ज्या औषधाला मान्यता मिळाली आहे, त्या औषधातील फॉर्म्युला आपल्या उपचार पद्धतीशी साधर्म्य दर्शविणारा असल्याचा दावाही डॉ. भिसे यांनी केला होता.
डॉ. भिसे यांची ही पोस्ट त्यांच्या नाव व क्रमांकासह व्हायरल झाली. सरकारी पातळीवरही दखल घेण्यात आली. शेवगावच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी डॉ. भिसे यांच्या रुग्णालयात भेट देऊन चौकशी केली. योग्य ती खात्री झाल्याशिवाय अशा पोस्ट व्हायरल करू नका, अशी समज त्यांना देण्यात आली. त्यानंतर शेवगावच्या तहसिलदार अर्चना पागिरे यांनी आज मंगळवारी डॉ. भिसे यांना चौकशीसाठी बोलाविले होते . डॉ . भिसे यांनी आपली फेसबुक पोस्ट आता डिलीट केली असून नवीन पोस्ट लिहली आहे.