मोठी बातमी..नगर शहरात सत्ताधाऱ्यांसाठी हॉटेलवर ‘ लसीकरण मोहिम ‘ ?

शेअर करा

कोविन अॅपवर नोंदणी करून पहाटेपासून रांगेत उभे राहूनही सामान्य व वृद्ध नागरिकांना लस मिळत नाही. असे असताना अहमदनगर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी महापालिका केंद्रावरील परिचारिकांना एका हॉटेलवर बोलावून लस घेतल्याची चर्चा सध्या नगर शहरात सुरू आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे

सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय दबावातून खासगी जागेत महापालिकेचे बेकायदेशीरपणे लसीकरण सुरू आहे. वशिलेबाजीसोबतच लसीचा काळाबाजार सुरू आहे का? याची चौकशी करावी आणि लसीकरणात पारदर्शकता आणावी, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. मनपाच्या सावेडी लसीकरण केंद्रावर बुधवारी एका केंद्रावरील परिचारिकांना लस घेऊन एका खासगी ठिकाणी बोलावले गेले व तिथे काहींचे लसीकरण झाल्याची चर्चा आहे. यावरून काँग्रेसने आयुक्तांना काही प्रश्न केले आहेत.

काय आहेत काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न ?

सावेडी मनपा आरोग्य केंद्रावरून आपल्या कर्मचाऱ्यांनी लस डॉन बॉस्को या ठिकाणी नेल्या, हे खरे आहे का? डॉन बॉस्को हे ठिकाण लस देण्याचे मनपाचे अधिकृत ठिकाण आहे का? सावेडीच्या मूळ केंद्रावर किती आणि डॉन बॉस्को येथे किती लस नेण्यात आल्या? ही संख्या कोणी आणि कशाच्या आधारे निश्चित केली? याची मनापा रेकॉर्डला मनपा कार्यालयापासून ते प्रत्यक्ष लस घेतलेल्या नागरिकांपर्यंत सर्व नोंदी करण्यात आल्या आहेत का? तेथे ज्यांना लस देण्यात आली, त्यांची आधी नोंदणी केली होती का? जाहीर करण्यात आलेल्या यादीतील नावे असणाऱ्या नागरिकांनाच या केंद्रावरून लस देण्यात आली का? डॉन बॉस्को येथून आपल्या परिचारिकांना राजकीय दबावातून एका खासगी ठिकाणी खासगी वाहनातून नेण्यात आल्याचे खरे आहे का?

लसीकरणाच्या शासकीय वेळेत शासकीय केंद्रावर उपस्थित न राहता खासगी ठिकाणी आपल्या परिचारिका कशा काय गेल्या? त्याबाबत मनपाच्या कोणत्या वरिष्ठांनी दबाव आणला होता? सदर खासगी ठिकाण हे मनपाचे अधिकृत लसीकरण केंद्र आहे का? या ठिकाणी कोणाचे लसीकरण करण्यात आले? शासकीय मालमत्ता असणाऱ्या लस सदर खासगी जागेत नेण्याबाबत मनपा आयुक्त यांचे आदेश होते का? मनपाच्या लसीकरण केंद्रातून लस बाहेर गेल्याच कशा? लस बाहेर नेवून मनपाचे कोणी लसीचा काळाबाजार करीत आहे का? यात कोणा कोणाचा सहभाग आहे? त्यांच्यावर कोणी राजकीय दबाव आणला का? या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनी कोणती कारवाई केली आहे का? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांच्या सह्या आहेत. सदर प्रकाराची पूर्णपणे चौकशी केली जावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे .


शेअर करा