आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर बलात्कार , व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

शेअर करा

आयकर विभागात कार्यरत असलेला एक अधिकारी उपचारासाठी महिला डॉक्टरकडे आला. त्याने उपचार करणाऱ्या तरुण महिला डॉक्टरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार करीत शारीरिक संबंधाचे मोबाईलने छायाचित्र आणि व्हिडिओ काढले. ती गर्भवती झाल्यानंतर तिचा बळजबरी गर्भपात देखील केला. या प्रकरणी आयकर अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. सुथांदिरा पुन्नोस्वामी बालन (वय ३५ रा. सेल्लूर, पॉण्डेचेरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आयकर आयुक्ताचे नाव असून ही घटना नागपूर इथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय डॉ. स्वीटी (बदललेले नाव) उत्तर नागपुरात राहते. २०१९ मध्ये सुथांदिरा हा मानकापूरमधील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये (एनएडीटी) प्रशिक्षण घेत होता. याच कालावधीत स्वीटी ही मानकापूरमधील एका रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी होती. प्रकृती खालावल्याने सुथांदिरा हे रुग्णालयात गेले. यादरम्यान त्यांची डॉ. स्वीटीसोबत ओळख झाली. स्वीटीनेही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती सुथांदिरा यांना केली. त्यांनी स्वीटीचा मोबाइल क्रमांक घेतला आणि त्यानंतर दोघे एकमेकांच्या संपर्कात राहू लागले.

आयकर अधिकाऱ्याने स्वत: विवाहित असतानाही अविवाहित असल्याचे सुथांदिरा याने स्वीटीला सांगितले. तिला दहेगाव रंगारीतील सनराइज हॉटेल ॲंण्ड रेस्टॉरेंटमध्ये बोलाविले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तिचे अश्लील छायाचित्र व व्हिडिओ काढले. दरम्यान ती गर्भवती झाली. सुथांदिराने तिला गर्भपात करायला लावला. दरम्यान सुथांदिरा विदेशात गेला आणि त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क तोडला. मार्च महिन्यात स्वीटीने एनएडीटीची बेवसाइट तपासली. त्यात सुथांदिरा हा विवाहित असल्याचे तिला कळाले. तिने सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली. सीताबर्डी पोलिसांनी चौकशी केली.

सुथांदिरा यालाही बोलाविले. यावेळी स्वीटीने मानसिक स्थिती खालावल्याचे कारण सांगून तक्रार दिली नाही. त्यानंतर सुथांदिरा हा तिला अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. स्वीटी कोराडी पोलिसात गेली. कोराडी पोलिसांनी तिला खापरखेडा पोलिसांकडे पाठविले. स्वीटीने तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. खापरखेडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुंडलिक भटकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


शेअर करा