‘ म्हणून ‘ चक्क सोन्याची कात्री हातात घेऊन सलूनचे शटर उघडले : कुठे घडली घटना ?

शेअर करा

तब्बल तीन महिन्यापासून सलून व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत होते मात्र आज अखेर नियम व शर्तीवर सलूनचे दुकान उघडण्यास परवानगी दिली आणि सलून व्यावसायिकांनी दुकाने उघडली. मात्र एक सलून व्यावसायिक असाही निघाला की त्याने पण केला होता की, ” जो पण ग्राहक पहिल्यांदा आता माझ्या दुकानात येईल त्याचे केस मी सोन्याच्या कात्रीने कापीन ” . आज दुकाने उघडल्याने त्याने सोन्याच्या कात्रीने पहिल्या ग्राहकाचे केस कापून बोहनी केली. बातमी कोल्हापूरमधील असून ह्या अजब बोहनीची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे .

आजपासून सलूनमध्ये फक्त कटिंग आणि हेअर डाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद असल्याने सलून व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत होते . सलून बंद असल्याच्या नैराश्यातून आत्महत्या देखील झाल्या होत्या अशा पार्श्वभूमीवर आज सलून सुरु झाल्याने व्यावसायिक आनंदी झाले आहेत . दुसरीकडे सलून असोसिएशनने दर मात्र अचानकपणे दुपटीपेक्षाही जास्त वाढवल्याने नागरिक मात्र नाराज असल्याचे चित्र आहे मात्र आज निदान दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याने सलून व्यवसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे .

कोल्हापुरातील रामभाऊ संकपाळ या सलून चालकाने तर सलून सुरू झाल्यास सोन्याच्या कात्रीने ग्राहकाचे केस कापण्याचा निश्चय केला होता. आज सलून सुरू होताच त्यांनी आपला हा निश्चय पूर्ण केला. सलून सुरू करताच त्यांच्या ‘मिरर सलून’मध्ये आलेल्या ग्राहकांचे चक्क सोन्याच्या कात्रीने केस कापण्यास सुरुवात केली. त्यामुळे या सलूनची पंचक्रोशीत जोरदार जाहिरात देखील झाली आणि लोकांनी देखील हे भाग्य आपल्या नशिबी यावे म्हणून दुकानापुढे गर्दी देखील केली.

याबद्दल अधिक बोलताना रामभाऊ संकपाळ म्हणाले, ” गेल्या तीन ते सव्वा तीन महिन्यानंतर सलून सुरू झाले. तीन महिने आमची उपासमार सुरू होती. हा पहिलाच दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे. त्यामुळे मी निश्चय केल्याप्रमाणे पहिल्याच ग्राहकाचे केस सोन्याच्या कात्रीने कापले. गेल्या तीन महिन्यात आम्हाला प्रचंड नुकसान सोसावं लागलं. त्यामुळे नाभिक समाजासाठी ठोस आर्थिक मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे “


शेअर करा